मुंबई - मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या आरोग्य गट विमा योजनेत आई वडीलांचा समावेश करावा अशी मागणी गेले कित्तेक महिने नगरसेवकांकडून करण्यात येत होती. याबाबत आयुक्तांनी नकार दिल्याचा अभिप्राय दिल्याने सोमवारी सदर प्रस्ताव पुन्हा प्रशासनाकडे विचारासाठी परत पाठवण्यात आला.
पालिका कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या आरोग्य गट विमा योजना जुलै २०१७ पासून बंद करण्यात आली. योजना बंद केल्याने कर्मचाऱ्यांना जास्त पैसे देऊन खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असल्याने योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी विरोधकांनी आक्रमक रूप धारण करत सभात्यागही केला आहे. नगरसेविका सईदा खान यांनी विमा योजनेच्या व्याख्येमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. योजनेमध्ये आई वडील तसेच सासू सासरे यांचा समावेश करण्याची मागणी खान यांनी केली होती. खान यांनी त्यासाठी सभागृहात ठरावाची सूचना मांडली होती. खान यांनी मांडलेली ठरावाची सूचना सभागृहाने मंजूर केली होती. त्यानंतर आयुक्तांनी विमा योजनेत आई वडील व सासू सासरे यांचा समावेश करण्यास नकार दिला होता. आयुक्तांनी दिलेल्या अभिप्रायाबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर केला होता. या प्रस्तावावर नगरसेवकांनी आई वडिलांचा समावेश करण्याची मागणी केली. आजही आई वडीलकर्मचाऱ्यांसोबत राहतात. वयोवृद्ध असलेल्या आई वडिलांचा सांभाळ कर्मचाऱ्यांना करावा लागतो. आईवडील वयोवृद्ध असल्याने त्यांच्या आरोग्यावर कर्मचाऱ्यांनाच खर्च करावा लागतो. त्यामुळे आई वडिलांचा समावेश योजनेमध्ये करावा अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली होती. यामुळे विमा योजनेचा प्रस्तावात आई-वडिलांचा समावेश करावा या मागणीसाठी प्रस्ताव पुन्हा प्रशासनाकडे फेरविचारसाठी पाठवण्यात आला. दरम्यान पालिका कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या गटविमा योजनेत कर्मचारी त्याची पत्नी व दोन मुलांसह आई-वडिलांचा समावेश करण्याबाबत प्रशासन विचाराधीन आहे. चार विमा कंपन्यांकडून अहवाल मागवला असून 25 मे रोजी होणाऱ्या स्थायी समिती बैठकीत योजनेबाबतची माहिती सादर करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी स्थायी समितीत दिली.
No comments:
Post a Comment