मुंबई - पावसाळ्यात मुंबईत झाडे पडून वित्त व जीवितहानी होते. वित्त व जिवीतहानी होऊ नये म्हणून अशा झाडांच्या फांद्याची पालिका प्रशासनाच्या पूर्व परवानगीने छाटणी करावी. तसेच मृत किंवा किडींचा प्रार्दूभाव झालेल्या झाडांची माहिती विभाग कार्यालयात नोंदवून त्यावर योग्य कार्यवाही करवून घ्यावी, असे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.
वृक्ष गणनेनुसार महापालिका क्षेत्रात एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खाजगी आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत. महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या झाडांची / वृक्षांची निगा पालिकेद्वारे घेतली जाते. तर सोसायटी, शासकीय - निमशासकीय संस्था, खाजगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या झाडांची जबाबदारी संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. दरवर्षी पावसाळ्याच्या काळात झाडे पडून दुर्घटना होत असतात. यापार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान खात्याची एक विशेष बैठक घेण्यात आली. यात पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश सिंघल यांनी उद्यान विभागावा दिले असल्याची माहिती परदेशी यांनी दिली. झाडांची छाटणी किंवा मृत, धोकादायक झाड कापावयाचे झाल्यास नियमांनुसार विहित शुल्क विभाग कार्यालयाकडे जमा करावे. ७ दिवसांनंतर झाडांच्या छाटणीची प्रक्रिया केली जाईल. छाटणी झाल्यानंतर तोडलेल्या फांद्या व इतर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधितांचीच किंवा पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराची असेल. पावसाळ्यापूर्वी खबरदारी घेतल्यास संभाव्य जीवित किंवा वित्तहानी टाळता येईल, असे आवाहन उद्यान अधीक्षक परदेशी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment