मुंबई - भांडूप येथे शौचालय दुर्घटना होऊन दोन जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचे पडसाद पालिका सभागृहात उमटले. नगरसेवकांनी आक्रमक रूप धारण करत जुन्या शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑटिड करावे व जूनी बांधकामे पाडण्यात यावी, अशी जोरदार मागणी लावून धरली. मात्र, प्रशासनाने आकडेवारीची माहिती नगरसेवकांना देऊन आपली बाजू मारुन नेली.
मुंबईत सध्या अस्तित्वात असलेली शाैचालये धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने ती दुरुस्ती करण्याकडे भर द्यावा, अन्यथा भांडुप येथे शाैचालय खचून दोन जणांना जीव गमवावा लागला, अशा घटना घडत राहतील. शाैचालय खासगी मालमत्तेत असो वा पालिकेच्या प्रशासनाने दुरुस्ती केलेच पाहिजे, असे निवेदन सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी महासभेत मांडले. राऊत यांच्या निवेदनाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा देत प्रशासनाचे वाभाडे काढले. सुमारे ४५ नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील शाैचालयाच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाला धारेवर धरले. मुंबईत शाैचालयाचा प्रश्न गंभीर असून सर्वाधिक त्रास मधुमेह रुग्णांना होतो. पालिका नव्याने शाैचालये बांधणार असली, तरी शाैचालयांची रुंदी कमी केली. झोपडपट्टीतही ज्येष्ठ नागरिक राहत असून त्यांना गुडघ्याचा त्रास असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी कमोड शाैचालये उभारावी, अशी सूचना राऊत यांनी केली.
मुंबईत सध्या ४५ हजार शाैचालये आहेत. यापैकी बहुतांश शाैचालये १८ वर्षापूर्वीची आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था खराब झाली आहे. एक शाैचालय बांधण्यास सुमारे ५० लाख रुपये खर्च येतो. परंतु, काम निकृष्ट दर्जाचे असल्याने दुर्घटना घडत आहेत, असा आरोप महापालिका विरोधी पक्ष नेते रविराजा यांनी केला. तसेच एफ नार्थ विभागात नव्याने बांधलेल्या शाैचालयाचे सहा महिन्याच्या आत दरवाजे तुटल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करताना प्रशासनाच्या निषेधार्थ सभा तहकूबीची मागणी केली. दुर्घटना टाळण्यासाठी शौचालयांचे ऑडिट करावे व दुरुस्तीची कामे नगरसेवक निधी करण्यास अनुमती द्यावी, याबाबत धोरणात तरतूद करावी, असा मुद्दा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मांडला. झोपडपट्टी, डोंगराळ भागातील शौचालयांकडे विशेष लक्ष द्यावे. वर्षातून तीन वेळा मलकुंड साफ करावीत, जीर्ण झालेली शौचालय पाडून येथे नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी केली.
दरम्यान, मुंबईत ५१७० शौचकूप बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी १६९० शौचकूप बांधली आहेत. १८२० प्रगतीपथावर असून १०३५ नवीन शौचकूपांचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती, अतिरिक्त अायुक्त विजय सिंघल यांनी दिली. म्हाडाची शौचालय अद्याप हस्तांतरित झाली नाहीत. विभागातील शौचालयांची साफसफाई करण्यासाठी सीपी लॉरी यंत्रणा कार्यान्वीत केली जाणार असल्याचे सांगत निवेदनावर बोलणे टाळले.
नवी शौचालये बांधा - मुंबईत ११,१७० शाैचालये जुनी झाली आहेत. पालिका प्रशासन ती पाडून त्या जागी १५, ७७४ नवीन शाैचालये बांधणार आहे. प्रशासनाने याबाबत तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी विशाखा राऊत यांनी महापौरांकडे केली.
आमदार खासदारांवर नगरसेवक नाराज - नगरसेवकांना विकास कामे करताना, प्रशासनाकडून कायद्यावर बोट ठेवले जाते. आमदार, खासदारांना मात्र नियमांतून वगळण्यात येते. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार बांधकामे होतात. अनेकदा या बांधकामांचा दर्जा चांगला नसताे. परिणामी दुर्घटना घडतात. दुर्घटनेनंतर आमदार, खासदारांवर टीका होण्याएेवजी नागरिक नगरसेवकांवर रोष व्यक्त करतात, अशी खंत नगरसेवकांनी सभागृहात मांडली.
No comments:
Post a Comment