मुंबई - मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारली जात आहेत. मात्र अँटॉप हिल येथील पालिकेच्या शाळेच्या दारातच सुलभ शौचालय पालिकेकडून उभारले जात आहे. या शौचालयाला स्थानिक नागरिकांकडून विरोध केला जात असून याठिकाहून शौचालय इतर ठिकाणी हलवण्याची मागणी केली जात आहे.
अँटॉप हिल परिसरात झोपडपट्टीवस्ती आहे. झोपड्पट्टीमधील २५०० नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेकडून पैसा द्या आणि वापरा या तत्वावर सार्वजनिक शौचालय उभारले जात आहे. हे शौचालय चक्क पालिकेच्या वामनराव महाडिक शाळेच्या दारात फुटपाथवर उभारले जात आहे. या ठिकाणी शौचालय उभारले जाऊ नये म्हणून शाळेचा विरोध आहे. शाळेचा विरोध असल्याने सुट्टी पडल्यावर शौचालयाचे काम सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी शौचालय उभारल्यास स्थानिक नागरिकांना व शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. यामुळे शौचालय उभारू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सायन कोळीवाडा तालुका अध्यक्ष मेहताब आलम सिद्धीकी यांनी एफ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांच्याकडे केली आहे. याठिकाणी बाजूलाच दोन शौचालय असताना पुन्हा नव्या शौचालयाची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. शाळेजवळ शौचालय उभारल्यास रोडरोमियोंचा सुळसुळाट होऊन विद्यार्थिनींना त्याचा त्रास सहन करावा लागणार असल्याने शौचालयाचे काम त्वरित थांबवावे अशी मागणी सिद्दीकी यांनी केली आहे.
शाळेजवळ शौचालय उभारल्यास विदयार्थी व शिक्षकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार आहे. शाळेजवळ शौचालय उभारणे योग्य नाही. कंत्राटदार आणि संस्थाचालकांच्या लाभासाठी शौचालय उभारली जातात. गरज असेल तिथेच शौचालय उभारली जावीत.
- रवी राजा, विरोधी पक्ष नेते
शाळेजवळ शौचालय उभारणे योग्य नाही. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होणार असल्याने शौचालय उभारण्यास विरोध केला जाईल.
- मंगेश सातमकर, शिक्षण समिती अध्यक्ष