मुंबई - एसटीच्या सत्तराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ‘शिवशाही’ या वातानुकुलित बसमध्ये सवलत देण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.
सध्या सुरु असलेल्या वातानुकुलित शिवशाहीच्या आसन श्रेणीतील बसमध्ये एकूण तिकीट मूल्याच्या ४५ टक्के तर वातानुकुलित शिवशाहीच्या शयनयान श्रेणीतील बसमध्ये (एसी स्लीपर) एकूण तिकीट मूल्याच्या ३० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या १ जून २०१८ पासून म्हणजे एसटीच्या ७० व्या वर्धापन दिनापासून ही सवलत राज्यभर लागू करण्यात येत आहे. याचा लाभ राज्यातील सर्व ज्येष्ठ प्रवाशांना मिळणार आहे, असे मंत्री रावते यांनी सांगितले.
सध्या एसटीच्या साध्या, रातराणी व निमआराम बसमधून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास तिकिटात ५० टक्के सवलत मिळते. अशा प्रकारची सवलत नव्याने सुरु झालेल्या शिवशाही बसमध्येसुद्धा मिळावी, अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मंत्री रावते यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत रावते यांनी याबाबत एसटी प्रशासनास प्रस्ताव तयार करण्यास सांगितले होते.