आयुक्त कार्यालयात आंदोलनाचा नगरसेवकाचा इशारा -
मुंबई - कुर्ल्यातील एम. एन. मार्गावर निर्मल पंजाब लॉज ही दोन मजली इमारत आहे. ही इमारत अनधिकृत असून यात अनैतिक धंदे चालतात. याबाबत पालिकेच्या स्थानिक विभाग कार्यालयात तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी कारवाई करत नसल्याने आयुक्तांना निवेदन देऊन आठ दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. या आठ दिवसात कारवाई न झाल्यास आयुक्तांच्या दालनासमोर मनसेस्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी व पदाधिकारी रिटा गुप्ता उपस्थित होत्या.
कुर्ला पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 166 मध्ये निर्मल पंजाब लॅाज ही दोन मजली इमारत अनधिकृतपणे उभी आहे. या इमारतीतल्या लॉजमध्ये वेश्या व्यवसाय़ राजरोसपणे चालवला जातो. याचा त्रास येथील स्थानिक नागरिक विशेषतः विद्यार्थी, महिलांना त्रास होतो. येथे चालणा-या प्रकारांमुळे येथून ये- जा करणा-यांना मान खाली घालून चालावे लागते. हे प्रकार तातडीने थांबवून या बेकायदा इमारतीवर कारवाई करा अशा तक्रारी येथील रहिवाशांनी करूनही कारवाईसाठी अधिका-यांचा निष्काळजीपणा सुरू आहे. याबाबत पालिका आयुक्तांची भेट घेऊन हा प्रकार लक्षात आणून कारवाईची मागणी केली, मात्र त्यांनीही जबाबदारी ढकलून तेथील सहायक आयुक्तांची भेट घेण्याची सूचना केली. त्यानुसार तेथील संबंधित सहायक आयुक्त अजीतकुमार अंबी, तसेच सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, भेट घेऊन कारवाईची मागणी केली. मात्र त्यांनी तर कुर्ला पश्चिम येथील एका वजनदार नगरसेवकासोबत चर्चा करण्याची सूचना करून जबाबदारी झटकली. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांनी कारवाईबाबत हलगर्जीपणा केला. त्यामुळे या अनधिकृत इमारतीवर अधिका-यांचा वरदहस्त असल्याचे स्पष्ट होते, असे तुर्डे यांनी सांगितले. शहरांत अनधिकृत बांधकामांमुळे आगीच्या घटना, इमारत कोसळणे यांसारख्या दुर्घटना वारंवार घडून जीवित व वित्तहानी होत असतानाही अधिका-यांकडून अशा इमारतींवर कारवाई करण्याऎवजी प्रशासनाचा आशिर्वाद असल्याचा आरोपही तुर्डे यांनी यावेळी केला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याची मागणी तुर्डे यांनी केली आहे. दरम्य़ान येत्या आठ दिवसांत या अनधिकृत इमारतीवर कारवाई न केल्यास आयुक्तांच्या दालनासमोर धरणे धरले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
No comments:
Post a Comment