मुंबई - मुंबईमधील मिठी नदीच्या कामाबाबत पालिका आणि एमएमआरडीए प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी भेट देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने आज (बुधवारी) पालिका आयुक्तांच्या दालनासमोर उपोषण करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी दिली.
मुंबईत २६ जुलैला अतिवृष्टी झाली होती. मिठी नदीमधून पाण्याचा निचरा न झाल्याने मुंबईची तुंबई झाली होती. याची कारणे शोधताना मिठी नदीच्या बाजुने अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याचे व नदीपात्र छोटे झाल्याचे उघडकीस आले होते. यावर पर्याय म्हणून मिठी नदीची रुंदी वाढवणे, संरक्षण भिंत बांधणे, नदी पात्रातील लोकांचे पुनर्वसन करणे इत्यादी उपाययोजना आखण्यात आल्या. त्यासाठी राज्य सरकारने एमएमआरडीए प्रशासनाची नियुक्ती केली. २०१४ नंतर मिठी नदीचे काम पालिकेकडे सोपवण्यात आले. त्यानंतर दरवर्षी नालेसफाई केली जात असली तरी संरक्षण भिंतीच्या कामाकडे व नदी पात्रात पडून असलेल्या डेब्रिज उचलण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सईदा खान यांनी सांगितले.
पालिकेच्या वॉर्ड क्रमांक १६८ मधील ३०० मीटरहून अधिक लांबीच्या संरक्षण भिंतीचे काम सुरु करावे व डेब्रिज उचलण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी मिठी नदीला भेट दिली. सिंघल यांच्या भेटीदरम्यान पालिका अधिकाऱ्यांनी नाल्यातील गाळ काढण्याची जाबाबदारी पालिकेची आहे. दगड, माती, विटा उचलण्याचे काम एमएमआरडीएचे असल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकली. एमएमआरडीएकडे संपर्क साधल्यावर मिठी नदीचे काम महापालिकेकडे हस्तांतरित केल्याचे सांगण्यात आले. पालिका आणि एमएमआरडीए प्रशासन एकमेकांवर जबाबदाऱ्या ढकलत असल्याने गेल्या तीन ते चार वर्षात संरक्षण भिंत उभी राहिली नाही, आजही नदीपात्रात डेब्रिज पडून आहे. ते उचलण्यात आलेले नाही. याबाबत आयुक्तांना निवेदन देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आज (बुधवारी) आयुक्तांच्या दालना समोर उपोषण करत असल्याचे खान यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment