मुंबई - भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप मुख्य आरोपी असलेल्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना अटक करण्यात आलेली नाही. भिडे यांना अटक न केल्यास येत्या पावसाळी अधिवेशनात विधान भवनाला घेराव घालू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी पत्रकार परिषदेत दिला. भिडेना अटक करून या प्रकरणाची सखोल तपास करावा व सत्यबाहेर आणावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ब्रिग्रेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, सरकार आणि मुख्यमंत्री जाणीव पूर्वक मिलिंद एकबोटे आणि मनोहर उर्फ संभाजी भिडेंना पाठीशी घालत आहे. भिडे आणि एकबोटे यांना वाचवण्यासाठी भाजपाने तथाकथित स्वयंघोषित सत्यशोधन समिती तयार केली आहे, ती समिती मुख्य आरोपींवरून लक्ष विचलित करून दिशाभूल करण्याचे काम करते आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे भानुसे यांनी केला. संभाजी भिडे यांची शिवप्रतिष्ठाण ही आरएसएसची उपसंघटना असून ती मनुवादी विचारसरणीचे आहे. त्यामुळे जाती- जातीमध्ये तेढ निर्माण करून तरुणांची माथी भडकवण्याचे काम संभाजी भिडे करत आहेत. मिलिंद एकबोटेला सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारला तरी त्याला अटक करायला पोलीस टाळाटाळ करीत होते. तसेच मुख्य आरोपी मनोहर भिडे आजही मोकाट फिरत आहे. असे असताना मुख्यमंत्री त्याला निर्दोष असल्याचे सिद्ध करत असल्याचे भानुसे यांनी सांगितले. भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्याय़ालयीन समिती स्थापन झाल्याचे मुख्यमंत्री सांगतात, परंतु अद्याप ही समिती भीमा कोरेगावला गेलेली नाही. त्यामुळे सरकार या प्रकरणात टाळाटाळ करून दिशाभूल करीत असल्याचे दिसते असे सांगत त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य बाहेर आणण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
No comments:
Post a Comment