पालिका सभागृहात पडसाद -
मुंबई - मुंबईमध्ये पावसाळ्याआधी नालेसफाईची कामे सुरु होतात. नालेसफाई झाल्याचे मोठं मोठे आकडे जाहीर केले जातात मात्र वास्तविक पाहता नालेसफाई फक्त कागदावरच झाल्याची दिसून येत असल्याचा आरोप नगरसेवकांनी सभागृहात केला. नालेसफाईची माहिती नगरसेवकांना मिळत नसल्याने आणि नालेसफाई वर्षभर सुरु राहावी म्हणून धोरणात बदल करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. दरम्यान नगरसेवकांच्या धोरणात बदल करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत नालेसफाईबाबत पालिका प्रशासन गंभीर असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले. नालेसफाईवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र हा खर्च वाया जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सभागृहात निवेदनाद्वारे केला. यावेळी बोलताना नालेसफाईच्या कामावर प्रशासनाचा अंकुश राहिलेला नाही. मुंबईमधून ७ लाख टन गाळ काढला जाणार आहे मात्र हा गाळ टाकणार कुठे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नालेसफाईची तृतीय पक्षाकडून ऑडिट करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शहरातील १ लाख १० हजार पैकी फक्त १४५० मॅनहोलवरच जाळ्या लावल्या जाणार आहेत, मग इतर मॅनहोल उघडे राहू नयेत म्हणून प्रशासनाने काय उपाययोजना केल्या, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्या उपाययोजना केल्या जाणार याची माहीती नगरसेवकांना देण्याची तसेच नालेसफाईच्या कामात पारदर्शकता असावी अशी मागणी रवी राजा यांनी केली.
या निवेदनावर बोलताना मिठी नदीच्या सुरक्षा भिंतीचे काम रखडले आहे, डेब्रिज नदीच्या ठिकाणी पडले आहे ते न उचलल्यास उपोषण करण्याचा इशारा सईदा खान यांनी दिला. नालेसफाई सुरु नसल्याचा आरोप करत मुंबईची जबाबदारी आयुक्त किंवा मुख्यमंत्र्यांची नसून सत्ताधारी म्हणून शिवसेनेची आहे असे खडे बोल समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी शिवसेनेला सुनावले. राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी शहरता पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आयुक्त घेणार का असा प्रश्न उपस्थित केला. भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी नालेसफाई आणि पंपावर करण्यात येणारा खर्च वाया जाणार आहे. नालेसफाई कंत्राटदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी केली जात असल्याने कंत्राटदारांना एकवेळी तरी दणका द्या अशी मागणी केली. यावेळी अनेक नगरसेवकांनी नालेसफाईची पाहणी करताना अधिकारी कंत्राटदारांना घेऊन गायब होतात, कंत्राटदार फक्त वरवरचा गाळ काढतात असे सभागृहाच्या निदर्शनास आणले.
शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न करता वर्षभर करावी यासाठी धोरणात बदल करण्याची तसेच नालेसफाई झाली कि नाही याबाबत नगरसेवकांचा दाखला घेण्याची मागणी केली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी नालेसफाई योग्य प्रकार होत असल्याचा दावा केला. मुंबईत पाणी तुंबू नयेत म्हणून अनेक प्रकल्प राबविले आहेत मात्र निसर्गाच्या कोपामुळे अतिवृष्टी होते असे सांगितले. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनीनाल्यात कचरा टाकला जात असल्याने लोकांच्या सवयी बदलण्याची गरज आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. रेल्वेच्या नाल्यामुळे पाणी तुंबते असा आरोप करून सत्ताधारी म्हणून आपल्यावर असलेली जबाबदारी झटकली.
No comments:
Post a Comment