मुंबई । प्रतिनिधी -
भायखळा येथील नागपाडा जंक्शनचे चार कोटी रुपये खर्चून सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. येथील चौकात २५ मीटर उंच तिरंगा उभारण्यात येणार असून मुंबईतील सर्वात उंच तिरंगा या ठिकाणी फडकणार आहे. मात्र या राष्ट्रध्वजाच्या सुरक्षेबाबत पालिकेकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी या ठिकाणी राष्ट्रध्वजाचा अवमान झल्यास किंवा एखादा अनुचित प्रकार घडल्यास गंभीर परिस्तिथी निर्माण होऊ शकते. याचा विचार करून चौकात राष्ट्रध्वज लावण्याबाबत पालिकेने फेरविचार करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पालिका प्रशासनाने मुंबईतील वाहतूक बेट तसेच जंक्शनचे सौंदर्यीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या ई विभागातील नागपाडा जंक्शनचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. नागपाडा जंक्शनचा परिसर अनधिकृत बांधकामे व फेरीवाल्यांनी व्यापला होता. त्यामुळे याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत होती. या जंक्शनचे सुशोभीकरण करण्यासाठी स्थानिक समाजवादी पक्षाचे नगरसेवक व गटनेते रईस शेख यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. शेख यांच्या मागणीनुसार प्रशासनाने नागपाडा जंक्शनचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेने शिल्पकाराची नेमणूक करण्याचे ठरवले आहे. तसेच या जंक्शनवर २५ मीटर उंच भारतीय तिरंगा ध्वज उभारण्यात येणार आहे. हा ध्वज मुंबईतील सर्वात उंच तिरंगा असणार आहे. या कामासाठी मे. हफिझ कॉन्ट्रॅक्टर वास्तू विशारद या सल्लागारानी दिलेल्या निर्देशानुसार सदर कामाचे अंदाजपत्रक, स्थापत्य व विद्युत कामाचे आराखडे व संकल्पचित्रे तयार केली आहेत. या कामासाठी पालिकेने मे. मॉ. आशिष कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला ४ कोटी ३५ लाखांचे कंत्राट दिले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव नुकताच स्थायी समितीने मंजूर केला असून पालिका सभागृहात मंजुरीसाठी येणार आहे. राज्य शासनाने विविध महनीय व्यक्तीचे पुतळे उभारण्यास मंजुरी देताना सदर संस्थेकडून संरक्षणाची हमी घेतली जाते यामागे पुतळ्याच्या राजकारणावरून दंगली होऊ नये हा उद्देश आहे. त्याच धर्तीवर एखाद्या चौकात राष्ट्रध्वज उभारणे धोक्याचे असल्याने याचा विचार करून या प्रस्तावावर पालिकेने पुनर्विचार करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
No comments:
Post a Comment