मुंबई - माथेरानच्या मिनी ट्रेनमध्ये लवकरच पारदर्शक व्हिस्टाडोमचा डबा जोडला जाणार आहे. त्यामुळे या डब्यातून बसल्या जागीच माथेरानच्या सौंदर्याचा आनंद द्विगुणित करता येणार आहे. माथेरानमधील पर्यटकांनी केलेल्या सूचनेनुसार रेल्वे बोर्डाकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.
माथेरानमधील सेवेचा आढावा घेण्यासाठी रेल्वे बोर्डातील सदस्य रवींद्र गुप्ता यांनी रविवारी तिथे पोहोचले. त्यांच्यासोबत या वेळी मध्य रेल्वेचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक संजयकुमार पंकज, मध्य-पश्चिम रेल्वेचे प्रधान मुख्य मेकॅनिकल इंजिनीअर यांच्यासह अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक विद्याधर मालेगावकर आदी उपस्थित होते. या वेळी गुप्ता यांनी मिनी ट्रेनमधील पर्यटक प्रवाशांशी संवाद साधला. यातील काही प्रवाशांनी पारदर्शक पद्धतीच्या डब्यांमुळे अजून निसर्ग अनुभवता येईल, असे मत व्यक्त केले. त्यावर पारदर्शक डबा पुरवण्यासंदर्भात सकारात्मक पाऊल उचलण्याचा निर्णय गोयल यांनी घेतला. या प्रकारचा डबा लवकरच तयार करून तो सेवेत जोडला जाणार आहे. पावसाळ्यानंतर ही सेवा पर्यटकांना वापरता येईल, या दृष्टीने नियोजन केले जाईल, असे पंकज यांनी स्पष्ट केले आहे.
भारतीय रेल्वेत सर्वप्रथम विशाखापट्टणम येथे व्हिस्टाडोम डब्यांचा वापर करण्यात आला. त्यानंतर तेजस एक्स्प्रेसमध्येही त्याच पद्धतीने पारदर्शक डबा जोडण्यात आला. या डब्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे छत पूर्णपणे पारदर्शक असून, त्यामुळे पर्यटकांना ३६० अंशांमध्ये निसर्गाचा आनंद लुटता येतो. परदेशांमध्ये व्हिस्टाडोम डब्यांची संकल्पना लोकप्रिय ठरल्यानंतर भारतातही त्याचा वापर हळूहळू सुरू झाला आहे. माथेरानमधील नव्या मिनी ट्रेनमध्ये या पद्धतीने पारदर्शक डबा तयार करण्यासाठी प्रचंड खर्च येणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांनाही त्यासाठी जास्त रक्कम मोजावी लागणार नाही, असाही दावा केला जातो..