मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या आरक्षणात बदल करण्यात आला आहे. महापौरांना पर्यायी घराचा शोध घ्यावा लागत आहे. मुंबईत महापौरांना साजेशे असे पालिकेचे बंगले नसल्याने नव्या विकास आराखड्यातील महापौर निवासस्थानासाठी दोन जागा सुचवण्यात आल्या आहेत. यामुळे महापौरांच्या निवासस्थानाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून सादर केला होता. या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली असून महापौर बंगल्याचे आरक्षण बदलासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. स्मारक बनणार असल्याने महापौरांना पर्यायी जागा देण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. पालिकेने पर्यायी निवासस्थान म्हणून भायखळा येथील राणीबागेतील बंगला सुचवण्यात आला होता. त्याला महापौरांनी नकार दिला आहे. पर्यायी निवासस्थान म्हणून जलअभियंत्यांचा बंगला मिळावा अशी मागणी सेनेकडून केली जात आहे. मात्र या बंगल्यात सनदी अधिकारी राहत असून त्यांनी बंगला खाली करण्यास नकार दिला आहे. यामुळे महापौरांच्या पर्यायी निवासस्थानाचा प्रश्न अनेक महिने रेंगाळत पडला आहे.
विकास आराखड्याला नुकतीच सरकारने मंजुरी दिली आहे. आराखड्यातील शिवाजी पार्क येथील म्युनिसिपल जिमखाना ( ४३४५ चौरस मीटर) व महालक्ष्मी येथील ऑफिसर्स क्लब (१२ हजार चौरस मीटर) या दोन जागा निवासस्थानासाठी सुचवण्यात आल्या आहेत. हे भूखंड पालिकेच्या घरांसाठी राखीव असल्याने येथे बंगला बांधणे सहज शक्य आहे. महापौरांनी यापैकी जागा सुचवल्यास त्या जागेवर महापौर निवासस्थान उभारण्यात येईल. नवे महापौर निवासस्थान उभारण्यासाठी तीन ते चार वर्षाचा कालावधी लागणार आहे.
No comments:
Post a Comment