मुंबई - भांडुप येथील साईसदन चाळीजवळील शौचालय कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतमृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंच्या कुटुबियांची मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी भेट घेऊन सांत्वन केले तसेच घटनास्थळाला भेट देऊन तातडीने शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱयांना दिले.
भांडुप (पश्चिम) येथील पाटीलवाडी साईसदन चाळीलगत असलेले २० आसनी शौचालय २८ एप्रिल खचून झालेल्या दुर्घटनेत लाबुबेन जेठवा आणि बाबुलाल देवासी या दोन जणांचा मृत्यु झाला होता. २० वर्ष जुने शौचालय हे खाजगी असल्यामुळे यापूर्वी दुरुस्तीसाठी आलेला निधीचा वापर न होता तो परत गेल्याचे नागरिकांनी यावेळी महापौरांना सांगितले. त्यासोबतच या शौचालयाचा जागेवर २० आसनी शौचालयच बांधण्याची मागणी नागरिकांनी यावेळी महापौरांकडे केली. महापौरांनी नागरिकांच्या या मागणीचा सहानभूतीपूर्वक विचार करुन याठिकाणी शौचालयाशिवाय इतर काहीही होणार नसून फक्त २० आसनी शौचालयच बांधण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच त्याचे ताबडतोब काम आमदार निधीतून करण्याचे निर्देश महापौरांनी महापालिका अधिकाऱयांना दिले. त्याचप्रमाणे परिसरात याप्रकारातील आणखी काही शौचालय असल्यास त्या शौचालयांची सुध्दा पाहणी करुन त्यांची ताबडतोब दुरुस्ती करण्याचे निर्देश महापौरांनी महापालिका अधिकाऱयांना यावेळी दिले. याप्रसंगी स्थानिक आमदार अशोक पाटील, सभागृह नेता विशाखा राऊत, विधी समिती अध्यक्षा सुवर्णा करंजे, माजी स्थायी समिती अध्यक्ष तथा नगरसेवक रमेश कोरगावंकर, स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी, नगरसेविका जागृती पाटील, ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे व संबधित अधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment