मुंबई - धोबीघाट येथील अनधिकृत बांधकामांवर पालिकेने केलेल्या कारवाई विरोधात सत्ताधारी शिवसेनेने आंदोलन केले आहे. शिवसेनेने केलेल्या या आंदोलनावर मनसेने टिका केली आहे. धोबीघाटमधील मुळचे परीट व्यावसायिक हद्दपार झाले असून परप्रांतीयांनी आपले बस्तान बसवले आहे. या परप्रांतियांना व अनधिकृत बांधकाम करताना शिवसेना पाठिशी घालत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. अनधिकृत व परप्रांतीयांविरोधात मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
महालक्ष्मी येथील धोबीघाटवर अनधिकृतपणे बांधकामे करण्यात आले आहे. धोबीघाट ही पुरातन वास्तू आहे. यावर सुरुवातीपासून परीट व्यवसाय चालत आला आहे. मात्र आता येथील मूळचा परीट व्यवसाय हद्दपार झाला असून आता त्याचा ताबा घेत त्यावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. येथील सर्व झोपड्या अनधिकृत असल्याने आरोग्य विभागाच्या अभिलेखावर याची नोंद नाही, असे माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितून उत्तर मिळाले असल्याचे मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी सांगितले. येथे अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या बांधकामांवर होणा-य़ा कारवाई विरोधात शिवसेना आंदोलन करून पाठीशी घालत असल्याचे धुरी यांनी म्हटले आहे. सत्तेत असलेलेच अनधिकृत बांधकामांच्या कारवाईला विरोध करतात त्यामुळे मुंबईत अनधिकृत बांधकामामागे कुणाचा हात आहे हे यावरून स्पष्ट होतो असा आरोपही धुरी यांनी यावेळी केला. धोबीघाट ही पुरातन वास्तू आहे. जेथे सुरूवातीपासून धोबी व्यवसाय करत होते. मात्र कालांतराने तेथे बाहेरून येणारे लोंढे आलेत आणि त्यांनी तिकडे अनधिकृत बांधकामे बांधली आहेत. मात्र उशिरा का होईना पालिकेला त्याची जाग आली आणि त्यांनी कारवाई केली, मात्र आता त्या कारवाईलाच शिवसेना आमदार, खासदार आणि नगर सेवक विरोध करत असल्याचे सांगत धुरी यांनी सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला. दरम्यान या मुद्द्यावर शिवसेना -मनसेमध्ये आता सामना रंगण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment