मुंबई - ईशान्य मुंबईमधील भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी एका भाजीविक्रेत्याच्या हातातून पैसे खेचून हे पैसे त्याच्या तोंडावर फेकले. ही घटना रविवारी सकाळी घडली असून या प्रकरणी सोमय्या यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आल्याने सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खासदार किरीट सोमय्या हे मुलुंड येथील राजे संभाजी मैदानाच्या बाजुला जनसपंर्कसाठी गेले होते. त्याच ठिकाणी सचिन खरात हे भाजी विक्रेते भाजी विकत होते. या भाजी विक्रेत्याला किरीट सोमय्या यांनी त्या ठिकाणावर भाजी विकण्यास मनाई केली. यावेळी त्या ठिकाणी एका महिलेने त्या भाजी विक्रेत्यास भाजीचे पैसे देऊ केले. हे पैसे किरीट सोमय्या यांनी त्यांच्या हातातून खेचून ते फाडले आणि खरात यांच्या तोंडावर फेकले. याप्रकरणी तक्रारदार सचिन खरात यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला असून, कोर्टातून परवानगी घेऊन पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. या घटनेची माहिती मिळताच नवघर पोलीस ठाण्याच्या बाहेर सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ते करू लागले. या घटनेच्या विरोधात सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर खासदार किरीट सोमय्या यांनी मात्र अद्याप काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही.
No comments:
Post a Comment