मुंबई । जेपीएन न्यूज -
नालेसफाई चांगल्या प्रकारे होत असल्याचा दावा करणाऱ्या पालिका प्रशासनाने यावर्षीही परेल हिंदमाता परिसरात पाणी तुंबणार अशी कबुली देत. पाणी तुंबल्यास मुंबईकरांनी ते सहन करावे असे वक्तव्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याने स्थायी समितीत विरोधकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
एप्रिल महिन्याचा सुरुवातीपासून शहरात नालेसफाई केली जात आहे. नालेसफाई चांगली सुरु असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. याकामाचा आढावा महापौरांकडून घेण्यात आला. पश्चिम उपनगरमधील नाल्यांची पाहणी करताना मुंबई तुंबणार असे वक्तव्य महापौरांनी केले होते. पूर्व उपनगरमधील नाल्यांची पाहणी करताना महापौरांनी पाणी तुंबणार नाही असे वक्तव्य केले. पाणी तुंबल्यास प्रशासन सज्ज असल्याचे महापौरांनी सांगितले होते. महापौरांनी पाणी तुंबणार नाही अशी ग्वाही दिल्यानंतर एकाच दिवसात प्रशासनाने महापौरांना खोटे पाडले आहे. हिंदमाता परिसरात पाणी तुंबल्यावर दोन - तीन दिवस पाण्याचा निचरा होत नव्हता. त्याठिकाणी कंबरे इतके पाणी साचायचे. आता ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन बांधल्यावर गुडघाभर पाणी साचत असून काही तासातच त्या पाण्याचा निचरा होत आहे. या परिसरात ५० वर्षांपूर्वीची ६५ झाडे आहेत. या झाडांची मुळे मलजल वाहिन्यांमध्ये वाढली आहेत. या वाहिन्यांमधून ५ ते १० टक्केच पाण्याचा निचरा होत आहे. यावर उपाय म्हणून नवीन मलजल वाहिनी टाकली जात आहे. त्याचे काम सुरु असून ते काम पूर्ण होण्यास आणखी काही महिने लागणार आहेत. यामुळे यावर्षीही हिंदमाता परिसरात पाणी साचणार असून नागरिकांनी ते सहन करावे असे वक्तव्य पर्जन्य जल वाहिन्या विभागाचे खणकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment