मुंबई - केरळमध्ये निपाह विषाणूच्या संसर्गामुळे ११ जणांनी जीव गमावला आहे. त्याची लागण मुंबईत होऊ नये म्हणून निपाहसाठी कस्तुरबा रुग्णालयात विशेष सेवा कक्ष स्थापन करा अशी मागणी सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे.
मागील काही दिवसांपासून केरळमध्ये निपाह विषाणूने थैमान घातले आहे. निपाहच्या संसर्गामुळे अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत निपाहची लागण होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये खास व्यवस्था करण्यात यावी. तसेच संसर्गजन्य आजारांवर उपचार करणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयात विशेष सेवा कक्ष स्थापन करावे, असे दिलीप लांडे यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. निपाह विषाणूच्या संसर्गामुळे मुंबईतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून ,सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत प्रचार आणि प्रसार करण्यात यावा. वर्तमानपत्रे विविध वृत्तवाहिन्यावर याबाबत बातम्या प्रसिध्द जनजागृती करावी असेही त्यांनी म्हटले आहे.