मुंबई । जेपीएन न्यूज -
गोरेगाव येथील टोपीवाला मंडई मार्केटचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यासाठी 151.73 कोटी रुपयांचे कंत्राट दिले जाणार होते. मात्र त्यासाठी नेमणूक करण्यात येणारा कंत्राटदार काळ्या यादीतील असल्याने त्याला या प्रक्रियेतून बाद करून दुसऱ्या कंत्राटदाराला काम देण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर आली आहे.
गोरेगाव परिसरातील पहाडी गावामध्ये 'टोपीवाला महापालिका मार्केट' आहे. मंडईच्या 4 हजार 401 चौ.मी. एवढ्या आकाराच्या भूखंडावर 18 मजली इमारत बांधण्यात येणार असून, सुमारे 151 कोटी 73 लाख खर्चाचा हा प्राजेक्ट असणार आहे. या पुनर्विकासातून य़ेथे भव्य नाट्यगृह उभारण्याचे प्रस्तावित आहे. प्रकल्पाचे कंत्राट मे. सनराईज स्टोन इंडस्ट्रीज या कंपनीला बहाल करण्यात आले होते. मात्र यांची निविदा लघुत्तम असल्याने त्यांच्या पात्रत्रेबाबत विविध अभिप्राय मागवले असता सनराईज हा मे. रेल्कॅान इन्फ्रा प्रोजेक्ट लि. या रस्ते कामांत एफआयआर दाखल झालेला व पालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराशी संबंधित असल्याचे पालिकेच्या लक्षात आले. सनराईज व रेल्कॉन या दोन्हीही कंपन्यांमध्ये सामायिक संचालक असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. तसेच विधी खात्याच्या अहवालानुसार मे. रेल्कॉन इन्फ्रा प्रोजेक्ट लि. यांची नोंदणी 16 मे 2016 पासून निलंबित करण्यात आले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर सनराईज या पहिल्या कंत्राटदाराला दिलेले कंत्राट रद्द करून आता कमी दराने आलेल्या मे. शेठ कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट बहाल केले आहे. यासाठी पालिकेला नव्य़ाने निविदा काढाव्या लागल्या आहेत. तब्बल 151. 73 कोटीचा खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी येणार आहे.
मंडईच्या पुनर्विकासातून भव्य नाट्यगृह उभे राहणार -
मंडईच्या पुनर्विकातून 18 मजल्यांची इमारत उभी राहणार आहे. यांत चौथ्या मजल्यापासून ते सहाव्या मजल्यापर्यंत 867 खुर्च्यांची क्षमता असलेले नाट्यगृह असणार आहे. तसेच या इमारतीमध्ये ग्रंथालय, योगा-केंद्र व व्यायामशाळा देखील साकारण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना शॉपिंगबरोबरच कलेची, वाचनाची आणि योगाचा आनंद लुटता येणार आहे. तसेच पार्किंग करता येतील अशी वाहन तळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. य़ाशिवाय महापालिकेच्या निवासी अधिका-यांसाठी निवासस्थाने असणार आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्पची सोय, सोलर पॅनेल्स, वर्षा जलसंचयन व्यवस्था (रेनवॉटर हार्वेस्टींग) आणि मंडईतील कच-यापासून सेंद्रीय खत तयार करणा-यासाठी एक प्रकल्प साकारला जाणार आहे. नाटय कलाकारांना रंगीत तालीम करण्यासाठी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर चार छोटे सभागृह बांधण्यात येणार आहेत. या नाट्यगृहमध्ये अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था बसविण्यात येणार असून, रंगमंचाच्या समोर खालच्या बाजूला 'ऑर्केस्ट्रा पीट' देखील असणार आहे. टोपीवाला मार्केटमध्येही उद्वाहने (लिफ्ट) असणार आहे.
No comments:
Post a Comment