मुंबई - मुंबई महापालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत पुरवण्यात येणाऱ्या खिचडीचा दर्जा योग्य नसतो, अशा तक्रारी शिवसेना, भाजपाच्या सदस्यांनी स्थायी समिती बैठकीत केल्या. त्याची दखल घेत अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी पालिका शाळेत वितरित खिचडीचा दर्जा तापसण्यात यावा, असे आदेश प्रशासनाला दिले.
महापालिका शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत शिजवलेले अन्न म्हणून खिचडीचे वाटप करण्यात येते. शालेय पोषण आहार पुरवठा मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सध्या महिला बचत गट व विविध स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत खिचडीचा पुरवठा करण्यात यावा, त्यासाठी प्रशासनाने संस्थांना मुदतवाढ व खर्च देण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला होता. या प्रस्तावावर बोलताना विविध महिला बचतगट संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या खिचडीचा दर्जा चांगला नसतो. ही खिचडी उघड्यावर, घाणेरड्या वातावरणात शिजवली जाते, अशा तक्रारी स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना, काँग्रेस, भाजपाच्या सदस्यांनी केल्या. विद्यार्थी दरदिवशी एकाच पदार्थ खाऊ शकत नाहीत म्हणून त्यांना बिस्कीट, चिक्की, शेंगदाणे, सुका मेवा यासारखे वेगवेगळे पदार्थ खाण्यास द्यावेत अशी मागणीही सदस्यांनी केली. सदस्यांच्या मागणीनुसार, पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारांतर्गत बिस्कीट, चिक्की, शेंगदाणे देण्याच्या विचारात आहे. त्यासाठी शासनाची मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल. तांदळाची खिचडी बनवून देताना तांदळाचे इतर पदार्थ देण्याबाबत विचार करण्याची सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.