मुंबई - विलेपार्ले येथील वॉर्ड क्रमांक ६५मधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका बिनिता वोरा यांच्यावर त्यांचे पती कुणाल वोरा यांनी बंगल्याच्या आवारात केलेल्या बांधकामामुळे पद रद्द केल्याची कारवाई केली जाणार आहे. तसे आदेश न्यायालयाने पालिका आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान बिनिता वोरा या सध्या नगरसेविका नसल्याने त्यांच्याकडून नगरसेवक म्हणून दिलेले भत्ते वसूल केले जाण्याची शक्यता आहे.
बिनिता वोरा यांनी १ बजाज रोड, विलेपार्ले पश्चिम येथील आपल्या कुंजविहार बंगल्याच्या आवारातील पडघराची भिंत तोडून बेकायदेशीरपणे एक व्यावसायिक गाळा उभारला होता. त्याविषयी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी जितेंद्र जानावळे यांनी महापालिकेकडे तक्रार करून रिट याचिका केली. महापालिकेने वोरा यांना १६ फेब्रुवारी २०१० रोजी बेकायदा बांधकामाबद्दल नोटीस बजावली होती आणि १ एप्रिल २०११ रोजी ते पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वोरा यांनी ते बेकायदा बांधकाम तोडले असल्याचे पत्र दिले होते. मात्र, बेकायदा बांधकाम पूर्णतः काढले नसल्याचे पालिकेच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होते. शिवाय त्यानंतरही बंगल्याच्या आवारात आणखी ४३ चौ. फुटांचे बेकायदा बांधकाम झाले असल्याचे पालिकेच्या सहविधी अधिकाऱ्यांच्या अहवालातून स्पष्ट झाले होते. बेकायदा बांधकाम आम्ही नाही तर भाडेकरूंनी केले, असा दावा वोरा यांच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, त्याविषयी कोणताही पुरावा नसल्याने खंडपीठाने तो फेटाळून लावला. अखेरीस आयुक्तांनी अपात्रतेबाबतची कायदेशीर कारवाई करावी आणि के-पश्चिम वॉर्डाच्या सहाय्यक आयुक्तांनी आधीचे व नंतरचे बेकायदा बांधकाम वोरा यांनी काढले आहे का, ते तपासावे आणि नसेल तर कायदेशीर कारवाई करावी, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले होते. दरम्यान याबाबत पालिकेने न्यायालयात अनधिकृत बांधकामाची माहित देऊन वोरा यांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली असता न्यायालयाने त्यांचे पद रद्द करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.