मुंबई - मुंबई महापालिकेचे मुलुंड येथे एस. टी. आगरवाल रुग्णालय आहे. या रुग्णालयाची पुणर्बांधणी केली जाणार होती. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी चुकीचे अंदाज पत्रक तयार केल्याने रुग्णालयाचे बांधकाम रखडले आहे. रुग्णालयाचे काम रखडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी महापौर व पालिका आयुक्तांकडे केली आहे.
मुलुंड येथील नागरिकांना अद्यावत रुग्णालयाची आवश्यकता आहे. परंतु येथील गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवेपासून वंचित ठेवले जात आहे. या परिसरात खाजगी रुग्णालये मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचा व्यवसाय कमी होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक या कामास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप गंगाधरे यांनी केला आहे. एम टी आगरवाल रुग्णालयाच्या पुर्नबांधणीच्या कामासाठी ३ ते ४ निविदा काढण्यात आल्या होत्या. कधी कमी प्रतिसादामुळे तर अंदाजित दरापेक्षा अधिक दरामुळे निविदा बाद करण्यात आल्या. निविदेतील अंदाजपत्रक चुकीचे असल्यामुळे हा प्रकार घडत आहे. काही महिन्यापूर्वी घनकचरा विभागाच्या वतीने चुकीचे अंदाजित दर बनवल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस देऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्याप्रमाणे एम. टी. आगरवाल रुग्णालयाच्या पुर्नबांधणीच्या कामाला विलंब झाला असल्याने अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी गंगाधरे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment