मुंबईत 619 अतिधोकादायक इमारती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 May 2018

मुंबईत 619 अतिधोकादायक इमारती


मुंबई । प्रतिनिधी - 
मुंबईत पावसाळयात इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. या दुर्घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू होतो. या दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 619 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केले आहे. अतिधोकादायक इमारतींची यादी दरवर्षी जाहीर करत असली तरी या इमारती खाली करण्यास पालिकेला अपयश येत आहे. दरम्यान या सर्व इमारतींना नोटीस देण्यात आल्या असून लवकरच वीज आणि पाणी कनेक्शन कापले जाईल अशी माहिती पालिकेच्या उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी दिली.

मुंबईतील 24 विभाग कार्यालयांमधील अतिधोकादायक इमारतींची यादी महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. या सर्व इमारती सी 1 प्रवर्गात असून या सर्व इमारती जमिनदोस्त करणे आवश्यक आहे. या इमारती दुरुस्तीपलिकडील असल्यामुळे पावसाळ्यात या इमारती अथवा चाळी कोसळून दुघर्टना होण्याची भीती आहे. त्यामुळे ही घरे त्वरीत रिकामी करण्यात यावी. अन्यथा तेथील वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
 
महापालिकेने जाहीर केलेल्या अतिधोकादायक इमारतींची यादीमध्ये एल विभागात सर्वात जास्त म्हणजे ११० इमारती अतिधोकादायक आहेत. त्या खालोखाल एन विभागात ५१, टी विभागात ४९, पी उत्तर विभागात ४५ इमारतींचा समावेश आहे. तर सर्वात कमी धोकादायक इमारती बी विभागात २, सी विभागात २, डी विभागात ४, ए विभागात ६, तर ई विभागात ७ इमारती आहेत. यादीमध्ये पालिकेच्या मालमत्ता विभागाच्याही ४४ इमारतींचा समावेश आहे. महापालिकेने या सर्व अतिधोकादायक इमारतींना नोटीस दिल्या आहेत. या यादीमधील १७२ इमारती खाली करण्यात आल्या आहेत. १७४ इमारतींना कोर्टाने स्टे दिला आहे. १२० इमारतींचे वीज आणि पाणी कनेक्शन कापण्यात आले आहे. ४१ इमारती तांत्रिक अडचणीत अडकल्या आहेत.

धोकादायक इमारती खाली करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. विभागवार सहाय्यक आयुक्तांना या इमारतींमधील नागरिकांबरोबर बैठका घेण्यास सांगितल्या आहेत. लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतरही इमारती खाली न केल्यास वीज आणि पाणी कनेक्शन कापले जाईल यामुळे तरी नागरिक धोकादायक इमारतींमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील असे चौधरी यांनी सांगितले. दरम्यान महापालीका दरवर्षी अशा अतिधोकादायक इमारतींची यादी जाहिर करत असली तरी या इमारती खाली केल्या जात नसल्याने या इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला आहे.

धोकादायक इमारतींवर अशी होते कार्यवाही -
महापालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर सी-१, सी -२ आणि सी-३ अशी कॅटेगरी केली जाते. सी-१ मध्ये आलेल्या इमारती अतिधोकादायक मानल्या जातात. सी-२ यादीत असलेल्या इमारतींच्या स्ट्रक्चरला रिपेअरची गरज असते, तर सी-३ इमारतींमध्ये किरकोळ दुरुस्ती आवश्यक असते. मुंबई महापालिका कायदा १८८८ अंतर्गत पालिकेकडून नोटीस बजावली जाते. सात दिवसांच्या आत इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले जातात.

अतिधोकादायक इमारतींची संख्या -
प्रभाग  इमारतींची संख्या 
ए : 6
बी : 2
सी : 2
डी : 4
ई : 7
एफ-दक्षिण : 10
एफ-उत्तर : 39
जी-दक्षिण : 11
जी-उत्तर : 12
एच पूर्व : 19
एच पश्चिम : 31
के-पूर्व : 36
के-पश्चिम : 29
पी-दक्षिण : 15
पी-उत्तर : 45
आर-दक्षिण : 15
आर-मध्य : 31
आर-उत्तर : 11
एल : 106
एम-पूर्व : 2
एम-पश्चिम : 32
एन : 51
एस : 10
टी : 49
मालमत्ता विभागाच्या ताब्यातील इमारती :44

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad