मुंबई - मुंबईला गिरण्यांचे शहर म्हणून ओळखले जात होते. मुंबईमधील गिरण्या बंद पडल्याने त्यांची आठवण म्हणून मुंबई महापालिका काळाचौकी येथे टेक्सटाईल म्युझियम उभारणार आहे. या टेक्स्टाईल्स म्युझियमच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये गिरणी कामगारांची मुले आणि त्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. स्थायी समितीत तसा ठराव नगरसेवकांनी केला असून त्याला मंजुरी मिळाली आहे.
मुंबईची ओळख असलेल्या कापड गिरण्या बंद होऊन त्या जागांवर व्यावसायिक व निवासी इमारती उभ्या रहात आहेत. गिरण्यांचा इतिहास माहिती व्हावा यासाठी राज्य शासन, मुंबई महापालिका आणि राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळाच्या पुढाकाराने काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिल इथे वस्त्रोद्योग संग्रहालय व सांस्कृतिक केंद्र निर्माण केले जाणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात मिलच्या जागेतील महापालिकेच्या ताब्यात आलेल्या एकूण जागेपैकी ७ हजार चौरस मीटरच्या जागेवर मूर्त्या आणि ध्वनी, प्रकाश व्यवस्थेमार्फत चित्रीकरणातून प्रदर्शन करण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला होता. यावेळी टेक्सटाईल्स म्युझियमच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगारात गिरणी कामगारांच्या मुलांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्राधान्याने सामावून घेतलं जावं, अशी मागणी नगरसेवकांनी उपसूचनेद्वारे केली. गिरणी कामगारांच्या मुलांना आणि नातेवाईकांना म्युझियममध्ये नोकरी दिली जावी अशी मागणी सर्व नगरसेवकांनी लावून धरली त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे गिरणी कामगारांच्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
No comments:
Post a Comment