‘स्टॉकहोल्डींग'च्या आगीत महापालिकेच्या फाईल्स जळल्याचा संशय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 April 2018

‘स्टॉकहोल्डींग'च्या आगीत महापालिकेच्या फाईल्स जळल्याचा संशय


प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश -
मुंबई - मुंबई महापालिकेचे डिजिटलायझेशन करण्यात येत असून त्यासाठी पालिकेच्या सर्व फाईली स्कॅन केल्या जात आहेत. स्कॅनींगचे काम दिलेल्या स्टॉकहोल्डिंग कंपनीला काही दिवसापूर्वी आग लागल्याने सरकारी कार्यालयांसह पालिकेची कागदपत्रे जळाल्याच्या संशय समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी स्थायी समितीत केला. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या डिजिटलायझेशचा एक भाग म्हणून पालिकेच्या इमारत प्रस्ताव खात्यासह इतर खात्यांची तब्बल १२ लाख पाने ‘स्कॅन’ करण्यासाठी स्टॉकहोल्डींग कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेड’ या कंपनीला देण्यात आली आहेत. मात्र या कंपनीच्या महापे येथील कार्यालयात काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत पालिकेची महत्वाची कागदपत्रे जळाली असल्याचा संशय शेख यांनी व्यक्त केला. तसेच या घटनेची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या आगीत एलआयसी, म्हाडा यांचीही महत्वाची कागदपत्रे जळाली असल्याचे शेख यांनी सांगितले. इमारत प्रस्ताव विभागाची महत्वाची कागदपत्रे जळाली असून ही कागदपत्रे मुंबईबाहेर पाठविण्याची घाई इमारत प्रस्ताव विभागाला होती असा आरोप शेख यांनी केला. मुंबई महापालिकेकडील 1870 पासूनची महत्वाची कागदपत्रे यात असल्याने मुंबईबाहेर पाठविण्यात आलेल्या कागदपत्रांची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी त्यांंनी केली. भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनीही शेख यांच्या मागणीला समर्थन देत ‘नेक्स स्पायडर’ ही यंत्रणा फाईल्स ‘स्कॅन’ करुन ती ‘सेव्ह’ करण्याचे काम करते. भाजपचे आमदार अमित साटम यांनी इमारत प्रस्ताव विभागातील भ्रष्टाचाराविषयी आरोप केले आहेत, त्यात तथ्य असल्याचे म्हटले आहे. ‘स्टॉकहोल्डींग’ मध्ये लागलेल्या आगीत इमारत प्रस्ताव विभागाच्या सर्वाधिक फाईल्स जळाल्या असल्याचा संशय कोटक यांनीही व्यक्त केला. तसेच ‘स्टॉकहोल्डींग’ला दिलेल्या महापालिकेच्या फाईल्स परत मागवण्याची मागणी कोटक यांनी केली. दरम्यान याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad