मुंबई - मुंबईत गेल्या काही वर्षांत अनधिकृत बांधकामांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. माजी नगरसेवक परमिंदरसिंग भामरा यांनी मांडलेली ठरावाची सूचना महापालीकेने मंजूर केली आहे.
काँग्रेसचे माजी नगरसेवक परमिंदरसिंग भामरा यांनी, महापालिका हद्दीत निर्माण होणाऱ्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई करून ते निष्कासित करण्यासाठी पालिकेने 'इमॅजरी सॅटेलाईट तंत्रज्ञान' विकसित करून पालिकेच्या सर्वच विभाग कार्यालयात त्याचा वापर करावा आणि सुंदर मुंबईचे स्वप्न साकार करावे, अशी मागणी एका ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती. ही ठरावाची सूचना जानेवारी २०१५ रोजी मंजूर करण्यात आली होती. या ठरावाच्या सूचनेत भामरा यांनी मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून त्यावर सॅटेलाईट इमॅजरी तंत्रज्ञानाद्वारे नियंत्रण आणणे व त्यावर निष्कासनाची कारवाई करणे शक्य आहे. तसेच पालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्याने अनधिकृत बांधकामावर लक्ष ठेवणे, नियंत्रण आणणे आणि पुढे कारवाई करणे शक्य होत नाही. त्यामुळे जर पालिका प्रशासनाने या सॅटेलाईट इमॅजरी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पालिकेला अनधिकृत बांधकामांना चाप लावणे सहज शक्य होणार आहे, अशी सूचना भामरा यांनी मांडली होती. भामरा यांची सूचना प्रशासनाने मंजूर करत त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
No comments:
Post a Comment