सॅनिटरी नॅपकिनच्या कचऱ्याबाबत महिलांमध्ये जनजागृती केली जाणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 April 2018

सॅनिटरी नॅपकिनच्या कचऱ्याबाबत महिलांमध्ये जनजागृती केली जाणार



मुंबई - मुंबई महानगरपालिकेने कचरा वर्गीकरण सक्तीचे केले आहे. महिलांकडून मासिक पाळीच्या वेळी वापरलेले सॅनिटरी नॅपकिन ओल्या तसेच सुक्या कचऱ्यात फेकले जातात. त्याचे वर्गीकरण करताना पालिकेच्या सफाई कामगारांना त्रास होतो. त्यामुळे वापरलेले सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट जीवजैवीक कचरा म्हणून करावी अशी मागणी नगरसेविकेने केली होती. त्यावर वापरलेल्या नॅपकिनचा कचरा कुठे आणि कसा टाकावा याची जनजागृती महिलांमध्ये केली जाणार असल्याचे पालिका आयुक्तांनी म्हटले आहे.

मुंबई महापालिकेने ओला तसेच सुका कचरा वर्गीकरण करण्याचे तसेच कचऱ्याची विल्हेवाट त्याच ठिकाणी लावण्याचे सक्तीचे केले आहे. महिलांच्या पाळीच्या दिवसात वापरण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिनची वेगळी अशी विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्याने महिलांकडून वापरलेले सॅनिटरी नॅपकिन ओल्या तसेच सुक्या कचऱ्यात टाकण्यात येतात. कचऱ्यातून टाकण्यात आलेले नॅपकिन्सचे वर्गीकरण पालिका कर्मचाऱ्यांना करावे लागते. असे वर्गीकरण करताना पालिका कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्याची विल्हेवाट वैद्यकीय काचऱ्याअंतर्गत करावी अशी मागणी माजी नगरसेविका ज्योत्सना दिघे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या सूचनेवर महापालिका आयुक्तांनी नुकताच अभिप्राय दिला आहे. या अभिप्रायात वैद्यकीय कचरा म्हणून वैद्यकीय कामासाठी वापरलेल्या काचा, ऑपरेशन सीझर, इंजेक्शन सुई, रबरी हातमोजे, कापसाचे बोळे यांची आरोग्यास हानिकारक असलेल्या कचऱ्यामध्ये गणना होत असल्याने "जिवजैविक कचरा वर्गीकरण अधिनियम २०१६" अन्वये स्वतंत्ररित्या विल्हेवाट लावली जाते. या नियमात सॅनिटरी नॅपकिनचा समावेश नाही. मात्र केंद्र सरकारने घन कचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील तरतुदी प्रमाणे सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या कंपनीने ते बनवण्यास पुनर्वापर होणाऱ्या पदार्थांचा उपयोग करावा व वापरलेले नॅपकिन पॅकिंग करण्यासाठी किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य प्रकारे पाकिटे पुरवणे बंधनकारकी केले असल्याचे म्हटले आहे. मात्र याची महिलांना जास्त माहिती नसल्याने घन कचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. यात वापरण्यात आलेले सॅनिटरी नॅपकिन निर्माता कंपनीकडून पुरविण्यात आलेल्या पाकिटांमध्ये गुंडाळून अविघटनशील म्हणजेच पुनचक्रीकरण होणाऱ्या सुक्या कचऱ्यामध्ये टाकण्यासाठी महिलांना प्रोत्साहित केले जाणार आहे. वापरलेल्या नॅपकिनचा कचरा वर्गीकरण करताना पालिका कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून नॅपकिनच्या कचऱ्याची निर्मिती स्तरावरच वर्गीकरण करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad