मुंबईत मुली गायब होण्याचे प्रमाण १५ पटीने वाढले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 April 2018

मुंबईत मुली गायब होण्याचे प्रमाण १५ पटीने वाढले


मुंबई - महिला आणि मुलींसाठी मुंबई असुरक्षित असल्याची चर्चा नेहमीच होत असते. माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीवरून आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या पाच वर्षात अल्पवयीन मुली गायब होण्याचे प्रमाण १५ पटीने वाढले आहे. तर गेल्या तीन महिन्यात तब्बल १२३ मुलींवर बलात्कार झाला आहे. 

शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलिसांकडून माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीनुसार मुंबईत सन २०१३ साली अपहरण आणि हरवलेल्या मुलींची संख्या ९२ इतकी होती, त्यात २०१७ साली १५ पटीने वाढ होऊन, २०१७ साली हा आकडा १ हजार ३६८ पर्यंत पोहोचला आहे. गेल्या पाच वर्षांत एकूण ५ हजार ०५६ मुली हरवल्या किंवा अपहरण झाल्या आहेत. त्यातील केवळ ४ हजार ६८६ मुलींचा शोध लागला असून, अद्यापही ३७० मुलींचा शोध लागलेला नाही. गेल्या पाच वर्षांतील हरवलेल्या आणि अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलांचा विचार केला असता, ३ हजार ३९० मुले गायब झाली होती. त्यातील ३ हजार १३१ मुले सापडली असून, २५९ मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही. अल्पवयीन मुला-मुलींशिवाय मुंबईतून गायब झालेल्या वयस्कांची आकडेवारीही मोठी आहे. २०१३ ते १७ दरम्यान मुंबईतून ६ हजार ५१० पुरुष आणि २ हजार ८३९ महिला हरवल्या आहेत. त्यांतील ५ हजार ३२२ पुरुष आणि २ हजार ३०९ महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. याउलट १ हजार १८८ पुरुष आणि ५३० महिलांचा शोध लागलेला नाही. मुंबईमधून अद्यापही ६२९ अल्पवयीन मुले आणि १ हजार ७१८ प्रौढ व्यक्तींचा शोध अद्याप लागलेला नाही. 

तीन महिन्यांत १२३ मुलींवर बलात्कार - 
मुंबईत मागील ३ महिन्यांत १२३ अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून उघड झाली आहे. यांपैकी ११४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दुसरीकडे याच कालावधीत मुंबईत ३६२ मुलींचे अपहरण झाल्याचेही उघड झाले आहे. त्यांपैकी २३५ मुली अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यास मुंबई पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad