नवी दिल्ली - कठुआ व उन्नाव बलात्कारकांडामुळे देशभरात सरकारचा निषेध केला जात असताना देशातील ४९ सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहून केंद्र सरकार आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'कठुआ व उन्नाव बलात्कारकांडामुळे केंद्र सरकार आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले असून, स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशात अशी भयावह स्थिती उद्भवली आहे,' असे मत या अधिकाऱ्यांनी या पत्रात व्यक्त केले आहे.
कठुआ व उन्नाव बलात्कारकांडाचे संपूर्ण देशात तीव्र पडसाद उमटलेत. या प्रकरणी सरकारवर चौफेर टीका होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी या दोन्ही घटना देशासाठी 'लज्जास्पद' असल्याचे स्पष्ट करत दोषींना कठोर शासन करण्याची ग्वाही दिली होती. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर, प्रसारभारतीचे माजी सीईओ जवाहर सिरकर, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलियो रिबेरो, माहिती अधिकार कार्यकर्ते अरुणा रॉय व माजी माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्ला आदी ४९ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी रविवारी पंतप्रधानांना एक खुले पत्र लिहून कठुआ व उन्नाव बलात्कारकांडावरील आपला रोष व्यक्त केला आहे. 'स्वातंत्र्योत्तर भारतातील ही सर्वात काळीकुट्ट घडी असून, यासाठी सर्वस्वी तुमचे सरकार जबाबदार आहे,' असा थेट आरोप या अधिकाऱ्यांनी या पत्राद्वारे मोदींवर केला आहे. 'कठुआ घटनेत अवघ्या ८ वर्षीय मुलीवर पाशवी व रानटी बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे देश भ्रष्टाचारात किती आकंठ बुडाला आहे, हे स्पष्ट होते. या घटनेमुळे नागरी सेवेशी संबंधित आमच्या सर्वच तरुण सहकाऱ्यांच्या मनात सरकार आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्याची भावना झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी कठुआ व उन्नाव या दोन्ही प्रकरणांतील पीडित कुटुंबीयांची माफी मागून या प्रकरणाचा वेगवान तपास केला पाहिजे,' असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment