मुंबई | प्रतिनिधी - मुंबईत अनेक ठिकाणी पाण्याचे मीटर बंद असताना पालिका प्रशासनाकडून बिलाच्या रक्कमेपेक्षा पाचपट बिले पाठविली जात आहेत. यामुळे रहिवाशी सोसायट्याना अर्थी भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत पालिका सभागृहात नगरसेवकांनी आवाज उचलून अन्यायकारक वसुली बंद करावी अशी मागणी करण्यात आली. यावर प्रशासनाने चौकशी करून सभागृहात अहवाल सादर करावा असे आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहेत.
मुंबई महापालिका हद्दीतील अनेक सोसायट्यांचे पाण्याचे मीटर बद्ध पडले आहेत. मीटर बंद अवस्थेत असताना अशा सोसायट्यांकडून पाच पट दंडासह वसुली केली जात असल्याचे नगरसेवक किरण लांडगे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे निदर्शनास आणले. कुर्ला विभागातील अनेक सोसायटींच्या पाण्याचे मीटर काही कारणास्तव बंद पडले असतानाही त्यांना दर तीन महिन्यांनी देण्यात येणार्या पाणी बिलात हजारो रुपयांची वाढीव आकाराची बिले पाठविण्यात येत आहेत. ज्या सोसायटीला तीन महिन्यात २०-२५ हजार रुपये पाणी बिल येत होते ते आता चक्क चार पट वाढवून म्हणजे जवळजवळ ९० हजार ते सवा लाखापर्यंत बिल माथी मारले जात असल्याचे किरण लांडगे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक सगुण नाईक हरकतीच्या मुद्द्याला पाठिंबा देत जलअधियंत्यांची मनमानी थांबवण्याची मागणी केली. याची गंभीर दखल घेत पाण्याचे मीटर बंद पडण्यामध्ये नागरिकांची कोणतीही चूक नाही. पाणीपुरवठ्यादरम्यान पाईपमधून येणारे दगड, कचरा, गाळ यामुळे हे मीटर बंद पडतात. त्यामुळे थेट कारवाई करणे योग्य नाही. सोसायट्यांची पाणीपट्टी थकीत असल्यास त्यांना नोटीस देऊन एक महिन्याची मुदत द्यावी, असे आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला दिले.
No comments:
Post a Comment