विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची दोषींना अटक करण्याची मागणी -
मुंबई - दहावीच्या नवीन पाठ्यपुस्तकात भारताचा सदोष नकाशा व राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यात आला आहे. या पुस्तकातील भारताच्या नकाशातून जम्मू व काश्मीरचा मोठा भूभाग देशाच्या सीमेबाहेर दाखवण्यात आला असून,या गंभीर प्रकणी सरकारने संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
विखे पाटील यांनी संतापजनक घटनेबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता दहावीसाठी भुगोलाचे नवीन पाठ्यपुस्तक प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातील प्रकरण ३ पान क्र. २४ वर भारताचा नकाशा प्रकाशित करण्यात आला आहे. परंतु, हा नकाशा अत्यंत चुकीचा असून,यामध्ये जम्मू व काश्मीरचा मोठा भाग भारताच्या हद्दीतच दाखवण्यात आलेला नाही. या शिवाय प्रकरण २ पान क्र. ९ वर भारताचा राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यात आलेला आहे. यामध्ये अशोक चक्रासाठी निळा नव्हे तर वेगळाच रंग वापरण्यात आल्याचे दिसून येते.
सन २०१८ च्या शैक्षणिक वर्षासाठी हे नवीन पुस्तक तयार करण्यात आले असून, तत्पूर्वी पाठ्यपुस्तक मंडळाने हे पुस्तक पुणे येथे आयोजित समीक्षण सत्रामध्ये समिक्षकांच्या विचारार्थ व अवलोकनार्थ ठेवले होते. त्यावेळी सटाणा येथील माजी प्राचार्य के.यू. सोनवणे यांनी यासंदर्भात मौखिक व लेखी आक्षेप नोंदवले होते. परंतु, पाठ्य पुस्तक मंडळाने त्याची दखल न घेता भारताचा सदोष नकाशा व राष्ट्रध्वज प्रकाशित केला आहे. याशिवाय इतरही अनेक चुका या पुस्तकात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. परंतु,त्याची दखल घेण्यात आलेली नसल्याचे दिसून येते.
या पार्श्वभूमीवर भारताचा सदोष नकाशा आणि राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यासंदर्भात राज्य सरकारने तातडीने तक्रार दाखल करून दोषींना अटक करावी. तसेच तज्ज्ञांशी चर्चा करून या पुस्तकातील चुका दुरूस्त कराव्या आणि सध्याचे पुस्तक मागे घेऊन नवीन पुस्तक उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment