मुंबईचा विकास आराखडा बिल्डरधार्जिणा - संजय निरुपम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 April 2018

मुंबईचा विकास आराखडा बिल्डरधार्जिणा - संजय निरुपम


मुंबई - मुख्यमंत्र्यांनी मुंबईचा नवीन विकास आराखडा मंजूर केला आहे. तो विकास आराखडा कमी आणि आपत्तीजनक आराखडा जास्त वाटतो. बिल्डरांसाठी हा आराखडा तयार केलाय, असे वाटत आहे. मुंबईतील ज्या जमिनी ना-विकास क्षेत्रामध्ये होत्या, त्या आता खुल्या होणार आहेत आणि याचा लाभ मोठ्या बिल्डर्सना मिळणार असल्याने हा विकास आराखडा बिल्डर धार्जिण असल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. 

मुंबईच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्या नंतर संजय निरुपम पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना एसआरए योजनेमध्येही फेरबदल केले जात आहेत. जे अतिशय चुकीचे आहे, व्यावसायिक कॉम्प्लेक्ससाठी ५ एफएसआय मिळणार आहे. हे भयंकर आहे. यामुळे कमला मिल्समध्ये ज्या प्रकारे अंदाधुंद कमर्शिअल बांधकाम झालेले आहे, तशी अनेक बांधकामे होतील. यामुळे मुंबईचे नुकसान होईल असे निरुपम यांनी सांगितले. मुंबई शहराचा एफएसआय उपनगरांपेक्षा कमी आहे. पहिल्यांदाच शहरामध्ये ३ एफएसआय दिला जाणार आहे. ज्यामुळे मुंबईत राहणे आणखी दाटीवाटीचे होईल. संपूर्ण मुंबईमध्ये ज्या विभागात २२ टक्के निवासी क्षेत्र आहे, तिथे त्यांना ५० टक्के निवासी क्षेत्र करायचे आहे असे त्यांनी सांगितले.

जी काही नवीन घरे बांधायची आहेत, ती शहराच्या बाहेर बांधावीत, अशी आम्ही पूर्वीपासून मागणी करत होतो. पण या नवीन विकास आराखड्यामुळे घरांची संख्या वाढणार आहे. नवीन १० लाख परवडणारी घरे बांधली जाणार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणतात. पण अगोदरच मुंबईतील सव्वापाच लाख घरे विक्रीविना पडून आहेत. मग अजून १० लाख घरे का बनवली जात आहेत? तसेच मुख्यमंत्री म्हणतात परवडणारी घरे बांधणार, तर मग परवडणाऱ्या घराची व्याख्या काय आहे? आणि असे घर कोणत्या किमतीत मिळणार? जर सध्याच्या किमतीनुसार ते १ करोड रुपयांना मिळणार असेल, तर ते परवडणारे असेल का? हा विकास आराखडा दुसरे-तिसरे काही नसून बिल्डरांना फायदा मिळवून देणारा आहे. यामध्ये देणे-घेणे किती ते आत्ताच सांगता येणार नाही. १५ लाख झोपडपट्टीवासीयांचे यामुळे किती हाल होतील? त्यांना वाली कोण आहे? असे प्रश्न निरुपम यांनी उपस्थित केले आहेत.

बीपीटीची जमीन बिल्डर्सच्या घश्यात घालण्याचा कट - 
बीपीटीच्या जमिनीचे (बॉम्बे पोर्ट ट्रस्ट) जे आरक्षण काढले आहे, त्याबद्दल बोलायचे झाले, तर यात खूप मोठा घोटाळा होणार हे दिसत आहे. बीपीटीचा विकास करायचा आहे, असे नितीन गडकरी म्हणत आहेत. त्यासाठी आता अहमदाबादवरून सल्लागार मागवला आहे. मुंबईतील बीपीटीची जागा मोठ मोठ्या बिल्डर्स आणि रियल इस्टेटच्या घशात घालण्याचा हा खूप मोठा कट आहे, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad