मुंबईत मनोरुग्णांची संख्या अधिक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 April 2018

मुंबईत मनोरुग्णांची संख्या अधिक

मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाणही अधिक - 
मुंबई - मुंबईकरांची बदलती जीवनशैली, खाण्यापिण्यात झालेल्या बदलामुळे आजरांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे पालिकेने केलेल्या संशोधनानंतर जाहीर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. पालिकेच्या अहवालानुसार चार प्रमुख रुग्णालयांमध्ये सर्वाधिक रुग्ण मनोविकाराशी संबंधित आहेत. पालिकेत उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 31 टक्के रुग्ण मनोविकारांशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. त्याखालोखाल सुमारे 23 टक्के रुग्ण हे रक्तदाब व मधुमेहाचे असल्याचे आढळून आले आहे. तसेच महापालिकेच्या 15 उपनगरीय रुग्णालयांमध्ये व 175 दवाखान्यांमध्ये येणा-या रुग्णांमध्ये जीवनशैलीशी निगडीत आजारांचे मोठे प्रमाण आढळल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. 

महापालिकेची 4 प्रमुख रुग्णालये, 15 उपनगरीय रुग्णालये आणि 175 दवाखान्यांमध्ये ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2017 या दोन वर्षाच्या कालावधीत उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांपैकी 72 लाख 61 हजार 130 रुग्णांशी संबंधित माहितीचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त 7 दिवस रुग्णालयात वा दवाखान्यात प्रत्यक्ष जाऊन तसेच 7 दिवसात आलेले बाह्यरुग्ण किंवा आंतररुग्ण म्हणून दाखल झालेल्या 1 लाख 13 हजार 472 रुग्णांच्या माहितीचाही अभ्यास करण्यात आला आहे. यानुसार तब्बल 73 लाख 74 हजार 602 रुग्णांच्या माहितीवर आधारित अभ्यास अहवाल नुकताच महापालिका प्रशासनास सादर करण्यात आला आहे. मनोविकार, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार तसेच रुग्णसंख्येच्या प्रमाणानुसार प्राणी दंश, हृदयविकार, डेंग्यू, दमा, अनाकलनीय ताप, जुलाब व मलेरिया या आजारांचा समावेश आहे. हा अभ्यास अहवाल महापालिका प्रशासनास सादर करण्याच्या निमित्त्ताने एका विशेष कार्यशाळेचे नुकतेच आयोजिन करण्यात आले होते. या एक दिवसीय कार्यशाळेला महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे, शीव रुग्णालयाच्या अधिष्ठात्री डॉ. जयश्री मोंडकर, भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे डॉ. दीपक राऊत व डॉ. एस. सुधाकर, महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर, मनपा विशेष रुग्णालयांचे प्रमुख डॉ. शशिकांत वाडेकर, बा.य.ल. नायर रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नर्सी कूपर सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे संयुक्तपणे हा अभ्यास प्रकल्प करण्यात आला. शीव रुग्णालयातील समुदाय औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सीमा बनसोडे - गोखे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात 51 तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचा-यांनी सलग 7 महिने या प्रकल्पावर काम केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

रुग्णांची आकडेवारी - 
महापालिकेच्या 4 प्रमुख रुग्णालयांमध्ये म्हणजेच केइएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयांमध्ये ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2017 या दोन वर्षांच्या कालावधी दरम्यान येऊन गेलेल्या रुग्णांपैकी 5 लाख 59 हजार 954 रुग्णांची माहिती अभ्यासण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 74 हजार 379 रुग्ण (31.14 टक्के) हे मनोविकारांवरील (Psychiatric Disorder) उपचारांसाठी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये आले होते. या खालोखाल मधुमेहावरील उपचारांसाठी 1 लाख 30 हजार 27 रुग्ण (23.22 टक्के), रक्तदाबावरील उपचारांसाठी 1 लाख 27 हजार 550 रुग्ण (22.78 टक्के), श्वानदंश वा प्राणीदंशावरील उपचारांसाठी 55 हजार 719 रुग्ण (9.95 टक्के), हृदयविकारांवरील उपचारांसाठी 41 हजार 930 रुग्ण (7.49 टक्के), डेंग्यूवरील उपचारांसाठी 8 हजार 376 रुग्ण (1.5 टक्के), दम्यावरील उपचारांसाठी 7 हजार 852 रुग्ण (1.4 टक्के), अनाकलनीय तापावरील उपचारांसाठी 7 हजार 742 रुग्ण (1.38 टक्के), जुलाबासंबंधीच्या आजारांवरील उपचारांसाठी 3 हजार 392 रुग्ण (0.61 टक्के), तर 2 हजार 987 रुग्णांचा (0.53 टक्के) हिवतापावरील उपचारांसाठी प्रमुख रुग्णालयांमध्ये आले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad