मुंबई - जम्मू-काश्मीर खोऱ्यातील कठुआ भागात व उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटना तसेच भाजपा सरकारच्या ४ वर्षांच्या कार्यकाळातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या निषेधार्थ शुक्रवारी आझाद मैदानात विविध सामाजिक संघटनांनी जोरदार निदर्शने केली. अत्यंत निंदनीय अशा या सामूहिक बलात्काराच्या घटनांतील नराधमांना वेळीच अटक करा आणि पीडित मुलींना न्याय द्या, अशी मागणी या वेळी निदर्शनकर्त्यांनी केली.
नौजवान भारत, दिशा विद्यार्थी संघटना, बिगुल मजदूर दस्ता, सीपीआय, वाघिणी आदी सामाजिक संघटना व राष्ट्रवादी, काँग्रेस, सपा आदी राजकीय पक्षांनी एकत्र येत 'भाजपा सरकार हटाव' अशा घोषणा दिल्या. या वेळी कामगार नेते विश्वास उटगी, प्रकाश रेड्डी, फिरोज मिठीबोरवाला, वर्षा विद्या विलास, ज्योती बडेकर, चित्रा वाघ, एम.ए. खलिद, आभा सिंग, अमोल मडामे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशात वाढत चाललेले महिलांवरील अन्याय-अत्याचार जोपर्यंत थांबणार नाहीत, तोपर्यंत अशी निदर्शने होतच राहणार. सरकारने या पार्श्वभूमीवर गांभीर्याने पावले उचलावीत व कायदा-सुव्यवस्था सुधारावी, अन्यथा देशात महिलांचा तीव्र मोठा मोर्चा काढू, असा इशारा या वेळी देण्यात आला. भरउन्हात आझाद मैदानात निदर्शनात सहभागी झालेल्या महिला यावेळी संतप्त झाल्या होत्या. महिला व मुलींच्या रक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली नाही, मात्र गायीची घेतली आहे. सरकारला महिला व मुलींपेक्षा गायी महत्त्वाच्या वाटत असल्याने सरकारचा निषेध आला. गेटवे ऑफ इंडियावर रात्री मेणबत्ती मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र काही वेळानंतर तो रद्द केल्याची घोषणा या वेळी करण्यात आली..
No comments:
Post a Comment