मुंबई - मुंबईत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. नालेसफाईची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पूर्ण होतील, असा विश्वास विभागस्तरीय सहाय्यक आयुक्त व पर्जन्य जलवाहिन्या खात्यांच्या अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या बैठकीत व्यक्त केला आहे.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामे आता सुरू झाली आहेत. प्रामुख्याने कंत्राट पद्धतीने करण्यात येणाऱ्या या कामांसाठी 154 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या वर्षी साधारणपणे मोठ्या नाल्यांमधून 4 लाख 94 हजार 739 टन एवढा गाळ काढण्याचे अंदाजित आहे. यापैकी 3 लाख 46 हजार 318 टन गाळ पावसाळ्यापूर्वी, उर्वरित 30 टक्के गाळ पावसाळ्यानंतर व छोट्या नाल्यांमधून पावसाळ्यापूर्वी 70 टक्के म्हणजेच 2 लाख 23 हजार 570 टन आणि उर्वरित 30 टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढण्यात येणार आहे. नालेसफाई कामांचा सविस्तर आढावा बैठकीदरम्यान घेण्यात आला. यामध्ये विभागस्तरावरील कामे, लॅटरल्स, जाळ्या, छोटी गटारे यांची साफसफाई यांचा समावेश होता. महापालिका क्षेत्रातील सर्व भागात नालेसफाईच्या कामांना आता सुरुवात झाली असून ही कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पूर्ण होतील, असा विश्वास विभागस्तरीय सहाय्यक आयुक्त व पर्जन्य जलवाहिन्या खात्यांच्या अधिका-यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment