महिलांना आर्थिक लाभ दिला जाणार
मुंबई - गरोदर महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रथमच गरोदर असलेल्या किंवा वर्षभरापूर्वी प्रसूत झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक लाभ दिला जाणार आहे असे पालिका आरोग्य विभागाच्या वैद्यकिय अधिकारी पद्मजा केसकर यांनी सांगितले. पालिका मुख्यालयात आरोग्य विभागाने पत्रकार परिषद घेवून प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची माहिती दिली.
जानेवारी २०१७ पासूनच्या गरोदर महिला किंवा प्रसूत मातांना या योजनेचा फायदा घेता येईल. शेवटच्या मासिक पाळीच्या दिनांकानंतर ७३० दिवसांच्या आत लाभार्थीने योजनेसाठी दावा करावा. तसेच मासिक पाळीची नोंद एमसीपी कार्डमध्ये केली नसल्यास बाळाच्या जन्मानंतर ४६० दिवसांत दावा करावा, अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही. प्रथम जिवंत बाळाकरिताच ही योजना लागू असेल. लाभार्थीला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यात दिली जाणार आहे. पहिल्या हप्ता एक हजार रुपये तर दुसरा आणि तिसरा हप्ता २ हजार रुपयांचा असेल. पहिल्या २ हप्त्यासाठी लाभार्थीला आधारकार्डची आवश्यकता भासणार नाही. मात्र, बॅंक किंवा पोस्ट खाते क्रमांक बंधनकारक आहे. अटी व आवश्यकत्या कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरच गरोदर महिला किंवा प्रसूत मातेला या योजनेचा लाभ मिळेल, असे केसकर यांनी सांगितले. दरम्यान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना देशभरात लागू केली आहे. राज्यातमध्ये ही योजना लागू करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. या आदेशानुसार पालिकेने मुंबईत ही योजना राबविण्यास सुरुवात केली असून सर्व आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्टर्स ट्रेनर्सचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. योजनेअंर्तगत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची जबाबदारी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर (एएनएम) सोपवली आहे. अर्ज भरलेली माहिती सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र यांच्यामार्फत पडताळणी करुन वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल. तसेच पालिकेच्या संकेत स्थळावरुन ही याबाबत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे केसकर म्हणाल्या. ऑनलाईन पध्दतीने राज्यसरकार लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment