मुंबई । प्रतिनिधी - पावसाळ्यात मुंबईची तुंबई होत असते. मुंबईत पाणी साचल्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठी माहोल उघडले जातात. अशाच एका मॅनहोलमध्ये पडून डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. न्यायालयाने ताशेरे ओढल्यावर मुंबईतील मॅनहोलना जाळ्या लावून सुरक्षित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 15 मे पूर्वी 1425 मॅनहोलना जाळ्या बसवल्या जाणार असून आतापर्यंत फक्त 214 जाळ्या लावण्यात आल्या आहेत. मात्र या जाळ्या फक्त शहरातल्या मॅनहोलनाच बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरातले मॅनहोल जाळ्यानी सुरक्षित केले जात असताना उपनगरातले मॅनहोल मात्र यंदाच्या पावसात असुरक्षितच राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मागील मुसळधार पावसात पोटविकार तज्ञ डॉ. अमरापूरकर यांचा उघड्या मॅनहोलने बळी घेतला. या दुर्घटनेनंतर पालिकेच्या निष्काळजीपणा समोर आला. सर्व क्षेत्रातून प्रशासनावर टीकेची झोड उठली. यानंतर अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सर्व मॅनहोलना जाळी लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला. एकूण 1425 जाळ्यांच्या निविदाना प्रशासनाची मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला पालिकेच्या संबंधित विभागाने सुरू केले आहे. 15 मे पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. मॅनहोलच्या झाकणाच्या 3.5 इंच खाली जाळी बसवली जाणार आहे. कितीही पाऊस झाला तरी अशी घटना घडणार नाही, अशा प्रकारची जाळी असेल. शहरात एक लाखाहून अधिक सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचे नाले आहेत. सद्या पूर परिस्थिती व पाण्याचा निचरा न होणा-या ठिकाणी या जाळ्या लावल्या जाणार आहेत. मात्र अशी ठिकाणे उपनगरातही आहेत. मात्र शहरातल्या मॅनहोलना जाळ्या बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. उपनगरातील मॅनहोलना जाळ्यांसाठी अद्याप निविदा काढण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे पावसापूर्वी येथे जाळ्या बसणे कठीण असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.