मुंबई - गेल्या काही वर्षात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत रुग्णालये आणि डॉक्टरांची संख्या खूपच कमी आहे. सर्वात मोठे सरकारी रुग्णालय म्हणून मुंबईमधील जेजे रुग्णालयाचे नाव घेतले जाते. या रुग्णालयात कॅन्सरवर अभ्यासक्रम सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी रुग्णालय प्रशासनाने मेडिकल काऊंसिलला पत्र पाठवले आहे.
स्तनाचा, तोंडाचा आणि गर्भाशयाच्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येत मुंबईसह महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वेळेवर निदान आणि उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. पण, कर्करोगाबाबत लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव असल्याने रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात उपचारासाठी येतात. या परिस्थितीत डॉक्टरांना त्यांच्यावर उपचार करणे अवघड असते. कॅन्सरवरील उपचार कुठे उपलब्ध आहेत याबाबत लोकांना माहिती नसते. त्यामुळे उपचारास विलंब होतो. कर्करोगाचं निदान आणि उपचार वेळेवर व्हावेत यासाठी येथे कॅन्सर ओपीडी सुरू करण्यात आली आहे. फक्त कॅन्सर ओपीडीच नाही तर, कॅन्सरची माहिती वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी पीजी कोर्स सुरू कऱण्याचा प्रयत्न आहे. यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउंसिलला पत्रही पाठवण्यात आले आहे. पीजी कोर्स सुरू झाला तर कॅन्सरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढेल. यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा केला जातो आहे.भविष्यात केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी तज्ज्ञ डॉक्टरांकडून जे.जे रूग्णालयात सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. यामुळे टाटा रुग्णालयात जाऊन केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीसाठी रुग्णांना करावी लागणारी पायपीट थांबेल असे येथील एका वैद्यकीय अधिकाऱयाने सांगितले.
No comments:
Post a Comment