मुंबई - मुलुंड, ठाणे आणि उल्हासनगर येथील राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत असलेल्या रूग्णालयांच्या आणि कर्मचारी निवासस्थानांच्या इमारतींच्या नूतनीकरणाचे काम तातडीने सुरू करावे. ज्या असुरक्षित इमारती आहेत तेथील कर्मचाऱ्यांचे स्थलांतर करून पुनर्बांधणीचे काम हाती घ्यावे, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज दिले.
राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत असलेल्या रूग्णालयांच्या इमारती आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारतीसंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सावंत बोलत होते. या बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. संजीव कुमार, राज्य कामगार विमा मंडळाचे संचालक डॉ. राजेश स्वामी उपस्थित होते.
आरोग्यमंत्री म्हणाले, मुंलुड येथील दोन इमारतींचे नूतनीकरण जून महिन्यापूर्वी करण्यात यावे. तसेच, उर्वरित पाच इमारतींमधील कर्मचाऱ्यांचे स्थलांतरण ज्या इमारतींमध्ये करावयाचे आहे, त्या इमारती सुस्थितीत असाव्यात. असुरक्षित असलेल्या पाच इमारतींच्या पुनर्बांधणीचे कामही तातडीने सुरू करावे.
उल्हासनगर येथील रूग्णालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्यापूर्वी रूग्णांना प्राथमिक उपचार देण्यासंदर्भातील सोय करण्यात यावी. अतिगंभीर रूग्णांना सेवा देण्यासाठी स्थानिक रूग्णालयांचे सहकार्य घ्यावे. ठाणे येथील रूग्णालयासंदर्भातील डागडुजीचे आणि पुनर्बांधणीचे कामही तातडीने पूर्ण करण्यासंदर्भातील निर्देश डॉ. सावंत यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment