आजही हजारो झाडांच्या बाजूला सिमेंटचे बांधकाम -
मुंबई - मुंबईत झाडे पडण्याच्या घटना सातत्याने होत असतात. अशा घटना झाडांच्या बाजूला बांधण्यात येणाऱ्या सिमेंटच्या व इतर बांधकामुळे होत असतात. त्यामुळे झाडांच्या बाजूला योग्य अंतर ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. याच प्रकारचे निर्देश हरित लवादाने पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, पालिकेने लवादाच्या निर्देशाला केराची टोपली दाखविण्याचे काम केल्याने आजही हजारो झाडांच्या बाजूला सिमेंटचे बांधकाम केल्याचे निदर्शनास येत आहेत. मुंबईत रस्ते बांधकामात अनेक ठिकाणी झाडांच्या मुळापर्यंत काँक्रीटीकरण करण्यात आले आहेत. मुंबईच्या विविध भागात व्यापारी व दुकानदारांनी दुकानांबाहेरच्या फुटपाथवरील झाडांना सिमेंटचे कठडे बांधल्याने झाडांच्या मुळापर्यंत पाणी पोहचत नाही. झाडांना कठडे बांधण्यात आल्याने मुळापर्यंत पाणी मिळत नाही. परिणामी झाडे सुकून ते पडण्याची शक्यता अधिक असते. झाडांना मारक ठरणार कठडे तात्काळ काढून टाकावेत, असे आदेश हरित लवादाने २७ मे २०१५ ला पालिकेला दिले होते. दरम्यान, तीन महिन्यात कठडे काढण्याचे पालिकेने यावेळी मान्य केले. परंतु, दिलेल्या मुदतीत हे कठडे काढता न आल्याने लवादाकडून आणखी वर्षभराची मुदत वाढवून घेतली. मात्र ही मुदत संपून तीन वर्ष झाली तरी कठडे काढण्यात आलेले नाहीत. वनशक्ती संस्थेने मुंबईतील झाडांच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ७० हजार झाडांभोवती कठडे बांधण्यात आले होते. तर २ हजार ५०० झाडांना कठडे असून यापैकी २ हजार कठडे काढल्याचा दावा पालिकेने केला होता. मात्र, आजही ७० हजारहून अधिक झाडांना सिमेंटचे कठडे कायम आहेत, अशी माहिती वनशक्तीचे अध्यक्ष डी. स्टॅलिन यांनी दिली. दरम्यान, झाडांभोवतीच्या सिमेंट कठड्यांमुळे झाडे सुकतात. झाडे सुकल्याने पावसाळ्यात ते पडण्याचे प्रमाण अधिक असते. झाडांची निगा राखण्याएेवजी खबरदारीचा उपाय म्हणून पालिका अशी झाडे तोडून टाकण्यावर भर देते. परंतु, झाडे तोडण्याएेवजी सभोवतालचे कठडे काढून टाकल्यास ती भक्कम उभी राहतील. तीन वर्षापासून झाडांच्या कठड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाविरोधात पुन्हा लवादाकडे दाद मागणार आहोत. शिवाय, झाडांचे पुन्हा सर्वेक्षण करुन ते हरित लवादाला सादर करणार असल्याचे स्टॅलिन यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment