मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत पावसाळयात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. अशा दुर्घटना घडल्यावर वित्त आणि जिवीत हानी होते. ही हानी टाळण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून धोक्याची सूचना देण्यात येते. अशीच सूचना एम / पूर्व विभागातील टेकडी तसेच डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपड्यांसाठी देण्यात आली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने तेथील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
एम/पूर्व विभागातील दिनक्वारी मार्ग येथील गौतमनगर, पांजरापोळ तसेच वाशीनाका येथील ओम गणेश नगर, राहुल नगर, नागाबाबा नगर, सह्याद्री नगर, अशोक नगर, भारत नगर, बंजारतांडा, हशू अडवाणी नगर व एल. यू. गडकरी मार्ग येथील विष्णू नगर या ठिकाणच्या टेकडीच्या / डोंगराच्या उतारावर मोठया प्रमाणात झोपडया वसल्या आहेत. झोपडपट्टीवासियांना महापालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, येत्या पावसाळ्यात मुसळधार पावसामूळे दरडी कोसळण्याची तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने तेथील स्थानिक रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे,असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. तसेच स्थलांतर न करता तेथेच राहणाऱया रहिवाश्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर रहावे, नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असेही पालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment