मुंबई - काही महिन्यापूर्वी मानखुर्द येथील दुर्घटनेनंतर भांडुप येथे शौचालय खचण्याची दुर्घटना घडली आहे. यात नागरिकांचा मृत्यू होत असल्याने निकृष्ट दर्जाची बांधकाम केलेल्या शौचालयांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. झोपडपट्टीमधील अनेक शौचालये सध्या धोकादायक स्थितीत उभी असून अशी शौचालये अनेकांचे जीव घेत आहेत. या शौचालयांची देखभाल कोणी करावी याबाबत वाद असल्याने शौचालयांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मानखुर्द, घाटकोपर येथील शौचालय दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. शनिवारी भांडुप येथील शौचालय खचून दोघांना जीव गमवावा लागला. अशा घटना अधून मधून घडत असतानाही पालिका, म्हाडाचे दुर्लक्ष आहे. मुंबईत झोपडपट्ट्या जवळपास लोकप्रतिनिधींच्या फ़ंडातून व म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडून शौचालये बांधण्यात आली आहेत. यांतील बहुतांशी शौचालये कच्ची बांधकामे केलेली निकृष्ट दर्जाची असल्याचे उघड झाले आहे. कच्चा माल वापरून निकृष्ट दर्जाची बनावट प्रमाणपत्रे सादर करून टॉयलेट उभारल्याचे दीड वर्षांपूर्वी उघड झाले होते. चौकशी नंतर म्हाडाने 37 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले होते. यांत अधिकारीही गुंतलेले असतात. त्यांच्यावर दिखाव्यासाठी कारवाई होत असल्याने निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची शौचालये उभी राहत असल्याचा आरोप केला जातो आहे.
शौचालयाची अवस्था -
मुंबईत १९८० पासून बांधलेल्यापैकी बहुतांश शौचालये धोकादायक अवस्थेत आहेत. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार एक शौचकूप ५० व्यक्तीसाठी असावे, स्वच्छ भारत अभियानअंतर्गत एक शौचकूप ३५ व्यक्तीसाठी असावे असे म्हटले आहे. मात्र मुंबईत सध्या २०० व्यक्तीकडून एका शौचकूपाचा वापर केला जात आहे. एका शौचालयाचे आयुर्मान ३० वर्षे धरण्यात आले आहे.
शौचालय उभारण्यात पालिका फेल -
शौचालय उभारण्यात पालिका फेल -
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 2015 मध्ये 5 हजार शौचालये बांधली जाणार होती. त्यापैकी तीन वर्षात फक्त 1500 ते 1800 शौचालयेच बांधली आहेत. जो कंत्राटदार मागील तीन वर्षात शौचालये बांधू शकला नाही, त्यालाच पुन्हा सोबत घेऊन पालिकेने 2018 मध्ये 18 हजार शौचालये बनवणार असल्याची घोषणा केली आहे. डीसीआर मध्ये सध्या अस्तित्वात असलेली शौचालये 34 टक्के नागरिकांसाठीच आहे. यामुळे इतर नागरिकांना शौचालये बनवण्यासाठी 2034 साल उजाडण्याची शक्यता आहे. मुंबईमधील 50 टक्क्याहून अधिक शौचालये धोकादायक अवस्थेत आहेत. नगरसेवकांच्या फंडामधून शौचालये दुरुस्ती करता येत नाही. मात्र आमदार आणि खासदार फंड असतानाही शौचालयांची दुरुस्ती व नुतनीकरणाची कामे होत नाहीत. यामुळे नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून शौचालयांचा वापर करावा लागतो आहे. याबाबत पालिका प्रशासना विरोधात काँग्रेस पक्ष सभागृहात आवाज उठवणार आहे.
- अश्रफ आझमी, नगरसेवक, काँग्रेस
No comments:
Post a Comment