मुंबई / जेपीएन न्यूज टीम -
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या अनेक वास्तू मुंबई येथील दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरात आहेत. यामुळे दादर रेल्वे स्थानकाचे नाव चैत्यभूमी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करावे अशी मागणी केली जात आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून भीम आर्मीच्या या संघटनेच्यावतीने दादर रेल्वे स्थानकाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे प्रतीकात्मक नामांतर केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेले राजगृह, आंबेडकर भवन, आंबेडकर कॉलेज इत्यादी वास्तू दादर परिसरात आहेत. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दादर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या परिसरात बाबासाहेबांचे स्मारक असलेली चैत्यभूमी आहे. या चैत्यभूमीला ६ डिसेंबरला लाखो लोक अभिवादन करण्यासाठी भेट देत असतात. दादर येथील इंदू मिल येथे बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारले जाणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दादर रेल्वे स्थानकाचे नाव चैत्यभूमी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करावे अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी भीम आर्मीने ६ डिसेंबरला दादरचे नामांतर केले होते. आता पुन्हा मुख्यमंत्री व रेल्वे मंत्र्यांना पात्र पाठवून भीम आर्मीने १४ एप्रिल पूर्वी दादरचे नामांतर करण्याची मागणी केली होती. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंबेडकर जयंतीच्या दिवशी दादरचे नामांतर करण्याचा इशारा भीम आर्मीच्या वतीने देण्यात आला होता. या इशाऱ्याप्रमाणे आज भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दादर रेल्वे स्टेशनवर ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नावाचे स्टिकर्स लावून दादरचे नामांतर केले.
No comments:
Post a Comment