२७ शालेय वस्तूही वेळेवर उपलब्ध होणार -
मुंबई - मुंबई महापालिकेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व गणवेश वेळेवर मिळत नाहीत अशी तक्रार नेहमीच केली जात होती. मागील वर्षांपासून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे. यावर्षीही विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय वस्तू व गणवेश मिळावा म्हणून पालिकेने नियोजन केले आहे. मे महिन्यात सर्व शाळांमध्ये शालेय वस्तूंचे वाटप केले जाणार असून या वस्तू विद्यार्थ्यांना जूनच्या पहिल्याच आठवड्यात वितरित केल्या जाणार आहेत.
बृहन्मुंबई महापालिकेच्या ११९५ शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तुंचे वाटप केले जाते. शिशुवर्गासह पहिली ते दहावीच्या विदयार्थ्यांसाठी गणवेश, बूट, मोजे याचबरोबर कंपास पेटी,प्लास्टिक पट्टी, कलर्स, ड्राईग पेन्सिल, ब्रश, रायटिंग पेन्सिल, खोडरबर,प्लॅ॑स्टिक बॉक्स, बॉलपेन बॉक्स अशाप्रकारे १५ शालेय वस्तू, शालेय दप्तर,पाण्याची बाटली, खाऊचा डबा असा दप्तर संच, वह्यांचा संच तसेच रेनकोट व छत्री आदी २७ शालेय वस्तू दिल्या जातात. मात्र मागील अनेक वर्षापासून या शालेय वस्तू प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुलांपर्यंत वेळेत पोहचत नव्हत्या. अनेकदा वर्षभर प्रतीक्षा करावी लागत असे. विलंबाने मिळणाऱ्या वस्तू निकृष्ट दर्जाच्या आढळून आल्या आहेत. स्थायी समिती, पालिका सभागृहात यावरुन वादही रंगले आहेत. प्रशासनाने विलंबाची ही प्रथा मागील वर्षीपासून बदलली आहे. यंदा ही शाळेच्या पहिल्याच दिवशापासून गणवेश व २७ वस्तू दिल्या जाणार आहेत. निविदा प्रक्रिया पार पडली असून मे महिन्यात प्रत्येक शाळांमध्ये वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच शाळेच्या पहिल्या दिवशी वस्तंचे वितरण केले जाईल. सन २०१७-१८ करिता २७ शालेय वस्तूंसाठी १२० कोटी तर गणवेशाकरिता ३१ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी दिली.