मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या मैदानांमध्ये क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी आयोजकांना जास्त भाडे द्यावे लागत होते. भाड्यात कपात करावी म्हणून क्रीडा संस्था आणि आयोजकांकडून मागणी केली जात होती. त्या अनुषंगाने महापालिकेकडे सतत पाठपुरावा करून मैदानांचे भाडे कमी करून घेतल्याने मुंबईतील क्रीडा संस्थांना दिलासा मिळेल अशी माहिती माजी सुधार समिती अध्यक्ष अनंत नर यांनी दिली आहे.
पालिकेच्या क्रीडांगणांवर अनेक सामाजिक संस्था, क्रीडा मंडळे विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करतात. मात्र पालिकेने खेळांच्या स्पर्धांसाठी मैदानांचे भाडे 2 नोव्हेंबर 2015 च्या परिपत्रकानुसार एका दिवसाला 500 ते 1000 चौ. मी.ला प्रतिदिन 15,500 आणि 1000 चौ. मी. पेक्षा जास्त जागेला प्रतिदिन 27 हजार भाडे आकारण्यास सुरुवात केली होती. तर सात दिवसांसाठी तब्बल 51 हजार रुपये भाडे आकारण्यात येत होते. या हजारोंच्या भाड्यामुळे क्रीडा मंडळांची मोठी आर्थिक अडचण निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलेल्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धांसाठी मैदानांचे भाडे कमी करण्यात आले. पालिका प्रशासनाने 19 जानेवारी 2018 रोजी शुद्धिपत्रक काढून 18 मार्च 2013चे जुने परिपत्रक लागू केले आहे. दरम्यान, 500 चौ. मी. पेक्षा कमी जागेला 1210 अनामत रक्कम आणि भाडे प्रतिदिन 308 आणि 5 हजार चौ. मी. पेक्षा अधिक जागेला अनामत रक्कम 2420 रुपये आणि भाडे फक्त 610 रुपये आकारले जाणार आहे. क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ही भाडेवाढ दिलासादायक असल्याचे अनंत नर यांनी सांगितले.