११ इमारतींच्या दुरुस्तीसाठी ७ कोटींचा खर्च -
मुंबई - मुंबईतील विविध प्रकल्प व विकासकामे होतात. या कामात बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना चेंबूर माहुल येथे पाठवण्यात येते. प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतींची काही वर्षातच दैन्यावस्था झाल्याने महापालिकेला त्यासाठी खर्च करून दुरुस्ती करावी लागत आहे. या आधी २२ इमारतींच्या दुरुस्तीचे कंत्राट दिल्यानंतर आता पुन्हा ११ इमारतींची दुरुस्तीचे कंत्राट दिले जात आहे. त्यासाठी पालिका तब्बल ७ कोटी रुपये खर्च करणार आहे.
मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना सोयी सुविधा मिळत नसल्याने महापौर, विरोधी पक्ष नेते व गटनेत्यांनी भेट देऊन पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान डी. बी. डेव्हलपर या विकासकाने बांधलेल्या एव्हरस्माईल संकुलातील इमारतींची अवस्था काही वर्षातच दयनीय झाल्याचे तसेच रहिवाशांना सोयी सुविधा मिळत नसल्याचे समोर आले होते. या पाहणीनंतर रहिवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे तसेच इमारतींची दुरुस्ती करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले होते. महापौरांच्या आदेशानुसार पाणीपुरवठा, सांडपाणी, पावसाळी पाणी वाहून नेणारी पाईपलाईन बसवणे, खोल्यांमधील व संडास बाथरूममधील लाद्या बदलणे, संडास बाथरूममधील लिकेज बंद करणे, दरवाजे एल्युमिनियमच्या खिडक्या दरवाजे दुरुस्त करणे बसविणे, सांडपाणी वाहून नेणारे पाईप चेंबर व लाईनची दुरुस्ती केली जात आहे. प्रशासनाने २२ इमारतींच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी रुपयांचा खर्च करण्याचे प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीत मंजूर करून घेतले आहेत. आता पुन्हा २९,३०,३१,३२,३३,३४,३५,३६,५९,७०,७१ या ११ इमारतीँची दुरुस्ती करण्यासाठी ६ कोटी ९८ लाख १६ हजार ४० रुपयांचे कंत्राट राजदीप एन्टरप्राईझेस या कंत्राटदाराला देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
यापूर्वी २२ इमारतींसाठी १४ कोटींचा खर्च -
देव इंजिनिअर्स कडून इमारत क्रमांक २,३,४,५,७,८,९,१०,११,६०,६१,६३ या १२ इमारतीच्या दुरुस्तीसाठी ६ कोटी ८३ लाख ४७ हजार ६१० रुपये खर्च केला जाणार आहे. तर भव्य इंटरप्रायझेसकडून १,६,३७,३८,३९,४१,४२,५६,५७,६४, या १० इमारतींच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी ३४ लक्ष ५ हजार ९०५ रुपये खर्च केले जाणार आहेत.
प्रशासनाला धारेवर धरणार -
माहूलमधील नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी व २२ इमारती दुरुस्तीकरण्यासाठी पालिकेने १४ कोटी रुपये खर्च केले आहेत. आता पुन्हा ११ इमारती दुरुस्त करण्यासाठी ७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पालिकेने एकाच संकुलातील इमारती दुरुस्त करण्यासाठी तीन वेगवेगळे कंत्राटदार नेमले आहेत. तीन वेगवेगळे प्रस्ताव सादर करण्यापेक्षा एकाच प्रस्ताव सादर का केला नाही. माहुलमधील या इमारती डी. बी. रियालिटी या विकासकाने बांधल्या होत्या. त्या इमारतींची इतक्या कमी वर्षात दुरुस्ती करावी लागत आहे. त्यामुळे विकासकाने केलेल्या निकृष्ट बांधकामावरून आणि त्याठिकाणी पुरविण्यात आलेल्या सोयीसुविधांवरून स्थायी समिती सदस्य प्रशासनाला धारेवर धरणार आहेत.
No comments:
Post a Comment