मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेचे सभागृह नेते यशवंत जाधव यांची स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या जागी कोणाची निवड केली जाणार अशी चर्चा गेले दोन दिवस पालिका वर्तुळात होती. आज या चर्चेला पूर्णविराम मिळला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने माजी महापौर विशाखा राऊत यांची सभागृह नेते पदी निवड करण्यात आल्याचीघोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली.
यशवंत जाधव यांची स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवड झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेले सभागृहनेतेपद रिक्त झाले होते. या महत्वाच्या दावर अत्यंत अनुभवी व्यक्तीची नेमणूक करणे क्रमप्राप्त होते. या पदासाठी तीन माजी महापौरांच्या नावाची चर्चा पालिका वर्तुळात सुरु होती. यामध्ये मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव व विशाखा राऊत यांचा समावेश होता. कालांतराने मिलिंद वैद्य यांचे नाव मागे पडून श्रद्धा जाधव आणि विशाखा राऊत या दोन माजी महापौरांची नावे चर्चेत होती. विशाखा राऊत यांना स्थायी समितीवर घेण्यात आले असल्याने सभागृह नेतेपदी त्यांची निवड होईल हे जवळ जवळ निश्चित झाले होते. महापालिकेच्या विशेष सभेत महापौरांकडून सभागृह नेत्यांचे नाव घोषीत होईल अशी अपेक्षा सर्वानाच होती. मात्र सभागृह संपताच महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन विशाखा राऊत यांचे नाव सभागृह नेते म्हणून घोषित केले. त्यांच्या नावाची घोषणा १० एप्रिलला सभागृहात केली जाणार आहे.
विशाखा राऊत यांची कारकीर्द -
विशाखा राऊत या १९९२ मध्ये मुंबई महापालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून आल्या, १९९७ मध्ये सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांची महापौरपदावर नियुक्ती करण्यात आली. दादर पश्चिम शिवाजी पार्क विभागामधून त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर मधल्या काळात त्या कुठल्याही पदावर कार्यरत नव्हत्या. सन २०१७ च्या पालिका निवडणुकीत मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नीचे आव्हान परतवण्यासाठी त्यांना पुन्हा सेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. पक्षाचा विश्वास सार्थ करीत त्यांनी विजय खेचून आणला. त्यांची सिध्दीविनायक ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.