45 मुख्याध्यापकांसह शिक्षकांचाही समावेश -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात बोगस प्रमाणपत्रावर नोकरी लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने शिक्षणमंत्री, पालिका आयुक्त, पालिका शिक्षणाधिकारी यांना पाठवले आहे. या पत्रात 45 मुख्याध्यापकांसह काही शिक्षकांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. बोगस प्रमाणपत्रावर नोकऱ्या लाटल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने आपल्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार या भितीने बोगस प्रमाणपत्रावर नोकरी लाटणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिकेत नोकरी मिळविण्यासाठी अनेकांनी बोगस प्रमाणपत्राचा वापर केला आहे. शिक्षण विभागात उच्च पदावर वर्णी लागावी, यासाठी उत्तरभारतीय व महाराष्ट्रीयन कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रे सादर केली आहेत. यात बऱ्याच कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक व जात वैधता प्रमाणपत्रही बोगस दिल्याचे म्हटले आहे. काहींनी उपशिक्षणाधिकारी पदावर जाण्यासाठी मेड इन उल्हासनगर प्रमाणपत्र सादर केल्याचे आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद आहे. बोगस प्रमाणपत्रक धारकांविरोधात अनेक तक्रारी आल्या. मात्र युनियनच्या मध्यस्थीने या तक्रारी मिटविण्यात आल्या असा आरोप, या पत्रातून केला आहे. आजही काही बोगस प्रमाणपत्रधारक पालिका सेवेत असून सुमारे 60 हजार ते 2 लाख रुपये वेतन घेऊन शासनाची आणि पालिकेची फसवणूक करत आहेत. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, पालिका आयुक्त अजोय मेहता व पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांना पाठविण्यात आले. या पत्रात शिक्षण आणि आरोग्य विभागाचे मिळून 79 बोगस प्रमाणपत्र धारक आहेत. त्यापैकी शिक्षण विभागातील 45 मुख्याध्यापक असल्याचे म्हटले आहे.