बायोमेट्रिक हजेरीत सवलत -
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. बायो मॅट्रिक हजेरीमुळे हजारो कर्मचाऱ्यांचा पगार निघाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. हजेरीच्या या पद्धतीत सुधारणा करावी अशी मागणी युनियनकडून केली जात आहे. असे असताना कर्जत आणि पुणे येथून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सुरु करण्यात आली. त्यासाठी पालिका मुख्यालय, रुग्णालये व विविध कार्यालयात मशीन बसवण्यात आल्या. या मशीन मधील वेळ वेगळा असल्याने, नेटवर्क नसल्याने, कर्मचारी एखाद्यावेळी काही मिनिटे उशिरा पोहचला तरी त्याची गैरहजेरी लागत होती. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचा पगार मिळाला नव्हता. याविरोधात युनियनने आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर बायोमेट्रिक पद्धतीत सुधारणा करण्याचे आश्वासन दिल होते. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने एक प्रस्ताव स्थायी समितीत सादर केला आहे. या प्रस्तावानुसार कर्जत आणि पुणे येथून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोज सायंकाळी अर्धा तास कार्यालय लवकर सोडण्याची विशेष सवलत देण्यात आली आहे. कर्मचाऱ्याला सवलत देताना आस्थापना विभागाने संबंधित कर्मचारी कर्जतच्या पुढे राहत असल्याची खातरजमा करावी, सवलत दिल्याने कार्यालयीन कामावर परिणाम होणार नाही याची दक्षाता घ्यावी असे म्हटले आहे. कर्मचाऱ्याला अशी सवलत देताना कर्मचाऱ्याने वर्षाला 5 नैमित्तिक रजा व 5 अर्जित रजा पालिकेला समर्पित कराव्यात असे म्हटले आहे. अशी सवलत दोन महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. प्रशासनाने केलेल्या बदलानुसार लिपिक पदावर असलेल्या शितल भारती व पूजा भिताडे या लोणावळा येथून पालिकेत कामाला येत असल्याने त्यांना कामाच्या वेळेत सवलत देण्यात आली आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment