मुंबई - आशिया खंडातील सर्वात श्रीमंत अशी महापालिका म्हणून नाव लौकिक असलेल्या मुंबई महापालिकेच्या बँकांमधील ठेवी नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई महापालिकेने स्थायी समितीत एक आकडेवारी सादर केली आहे त्यामधून पालिकेच्या विविध बँकांमध्ये तब्बल ७२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असल्याची आकडेवारी स्थायी समितीमध्ये माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील खर्च न झालेली तसेच पालिकेकडे डिपॉझिट म्हणून जमा झालेली रक्कम ६.२५ ते ७ टक्के व्याजाने बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, युनियन बँक, सिंडिकेट बँक, इंडियन ओवरसीज बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, कॅनरा बँक, आंध्रा बँक इत्यादी बँकांमध्ये पालिकेने किमान ४५ लाखांपासून ते ५८८ कोटी रुपयांच्या रकमा ३६५ ते ५४२ दिवसांच्या मुदतीसाठी गुंतवल्या आहेत. या गुतंवणुकीमधून पालिकेला ४५०० कोटी रुपयांचे व्याज मिळते. पालिकेची विविध बँकांत जानेवारी २०१८ प्रारंभी गुंतवणूक रक्कम ६९ हजार ८८४ कोटी रुपये एवढी होती. तर ३१ जानेवारी २०१८ पर्यंत ही रक्कम वाढून ७१ हजार १२६ कोटी रुपये एवढी झाली होती. तर आता फेब्रुवारी अखेर एकूण रक्कम ७२ हजार ४ कोटी रुपये एवढी झाली आहे. या एकूण ७२ हजार कोटींच्या निधीमध्ये कंत्राटदार यांच्या परताव्याचा रकमा व पालिका कर्मचारी, अधिकारी यांच्या पीएफचे व अन्य स्वरूपाच्या रकमा अशा २१ हजार कोटी रुपयांचा समावेश आहे. मात्र उर्वरित रक्कम म्हणजे ५१ हजार कोटींची रक्कम ही पालिकेने प्रस्तावित नवीन पाणी प्रकल्प, कोस्टल रोड इत्यादी मोठया प्रकल्पासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान महापालिकेच्या ७२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी बँकांमध्ये असताना पालिकेचा अंगीकृत उपक्रम असलेल्या बेस्टला पालिकेकडून आर्थिक मदत केली जात नसल्याने स्थायी समितीत यावरून वाद होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment