मुंबई | प्रतिनिधी - ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायायालयाचा निर्णय, भीमसैनिकांवरील खटले मागे घेणे तसेच भीम आर्मी संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावरील रासूका काढून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी भीम आर्मीच्यावतीने आज (सोमवार २ एप्रिल रोजी) राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील सकाळी ११ वाजता काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या संस्था संघटनादेखील सहभागी होणार असल्याची माहिती या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी दिली.
सर्वोच्च नायायालयाच्या खंडपीठाने ऍट्रॉसिटी प्रकरणात संबंधित आरोपीला तात्काळ अटक न करण्याचा निर्णय दिला असून यासंदर्भात देशभरातील अनुसूचित जाती जमातीमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या खटल्याची पुनर्विचार याचिका ९ बेंचच्या खंडपीठासमोर चालविण्यात यावी, केंद्र तसेच राज्य सरकारने या प्रकरणात ऍट्रॉसिटी कायद्याचा अभ्यास असणा-या जेष्ठ व तज्ञ वकिलांची नेमणूक करावी, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी केली आहे. भीम आर्मीचे संस्थापक ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांना सर्व प्रकरणात जमीन मिळाला असतानादेखील उत्तर प्रदेश प्रशासनाने त्यांच्यावर अन्यायकारक रासुका कायदा लावला आहे. मागील १० महिन्यांपासून ते सहारणपुर उत्तर प्रदेश येथील कारागृहात आहेत, त्यांच्यावरील रासूंका काढून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी. भीमा कोरेगाव येथील दंगलींनंतर ३ जानेवारी रोजीच्या आंदोलनात अनेक भीमसैनिकांवर खटले दाखल करण्यात आले असून त्यांचे खटले मागे घेण्याची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी ते अद्याप मागे घेण्यात आले नाहीत, हे खटले त्वरित मागे घेण्यात यावेत. अशा मागण्या भीम आर्मीने केल्या आहेत. या मागण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे.